Gaurav More : सिंह जंगलातच शोभून दिसतो, हिंदीतील शोमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर गौरव मोरे म्हणतो, हे त्यांचं प्रेम...
Gaurav More : हिंदी कार्यक्रमामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर गौरव मोरेने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
Gaurav More : महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम गौरव मोरे (Gaurav More) सध्या हिंदी सिनेसृष्टीतही प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करत असल्याचं पाहायला मिळतंय. पण त्याच्या या कार्यक्रमावार हिंदी आणि मराठीतले प्रेक्षक बरेच नाराज असल्याचं चित्र आहे.पण हे सगळं प्रेक्षकांचं प्रेम असल्याचं म्हणत गौरवने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रोलर्सना गोड शब्दांत उत्तर दिलं आहे.
फिल्टरपाड्याचा गौरव मोरे ते महाराष्ट्रातील हास्यजत्रेतील गौरव मोरे हा प्रवास गौरवसाठी खूप खडतर होता. त्यावरही गौरवने एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. तसेच होणार्या ट्रोलिंगवर बोलताना गौरवने या सगळ्याचा माझ्या कामावर कधीच कोणता परिणाम होत नसल्याचंही म्हटलं आहे.
हे सगळं त्यांचं प्रेम - गौरव मोरे
मराठीतून हिंदीत गेल्यापासून गौरवला खूप ट्रोल केलं जातंय, यावर बोलताना गौरवने म्हटलं की, 'त्यांच माझ्यावर आणि माझं तुमच्यावर असलेलं हे प्रेम आहे. अनेकांनी मला म्हटलंही की तू इकडचा सिंह आहेस, तू तिकडे का गेलास? पण ते त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे. मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. मी सोडलं काहीच नाहीये, जे इकडे करायचो तेच तिकडे करतोय.'
ट्रोलर्सना काय उत्तर देशील यावर गौरवने 'आय लव्ह यू' म्हटलं. पुढे तो म्हणला, 'तुमचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे. फक्त जे फोटो न ठेवता कमेंट करतात ना ते मला पटत नाही. तुम्ही समोरासमोर या, आपण बोलूयात. तुम्ही तुमच्या घरचा पत्ता मला द्या, मी घरी येतो. तुम्ही मला बिंधास्त बोला. जे ट्रोल करतायत, की तू तिकडे का केला, त्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते बोलतात आणि माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही मला काहीही बोला ते मी स्वीकारेन. फक्त जे प्रोफाईल न ठेवता बोलतात, ते मला आवडत नाही आणि हे मी तुम्हाला तोंडावर सांगतो.'
ट्रोलर्सचा आयुष्यावर काही फरक पडतो का?
ट्रोलर्सचा काही फरक पडतो का? यावर बोलताना गौरवने म्हटलं की, 'याचा काहीही फरक पडत नाही, कारण हे त्यांचं प्रेम आहे आणि तिकडे सांभाळून घेणारी आपली माणसं आहेत, हेमांगी ताई आहे, कुशल दादा आहे. त्यामुळे याचा काहीही फरक पडत नाही.'