Ravindra Mahajani : 'हँडसम नायक, कायम हसतमुख..'; रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर सुबोध भावेची भावूक पोस्ट
सुबोध भावेनं (Subodh Bhave) पोस्टच्या माध्यमातून रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Ravindra Mahajani : अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले आहे. 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रविंद्र महाजनी यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि रविंद्र महाजनी यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावेनं (Subodh Bhave) एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून सुबोध भावेनं रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सुबोध भावेची पोस्ट
सुबोध भावेनं रविंद्र महाजनी यांचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मराठी चित्रपटातील माझं व्यावसायिक अभिनेता म्हणून पहिलं पाऊल रविंद्र महाजनी यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या "सत्तेसाठी काहीही " या चित्रपटातून पडले. अतिशय रूबाबदार, विलक्षण देखणे, खऱ्या अर्थाने मराठी मधील हँडसम नायक , कायम हसतमुख अशीच तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेली आहे. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली' सुबोध भावेनं शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
'सत्तेसाठी काहीही' या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा रविंद्र महाजनी यांनी सांभाळली. या चित्रपटात सुबोधसोबतच संजय मोने, अमिता खोपकर, दिलीप जोगळेकर, सुनील गोडबोले, बाबा शेख, श्रीराम रानडे, श्रीराम पेंडसे, प्रदीप वेलणकर या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. 'सत्तेसाठी काहीही' हा चित्रपट 2002 मध्ये रिलीज झाला.
View this post on Instagram
रविंद्र महाजनी यांचा 'झुंड' हा पहिलाच सिनेमा खूप गाजला.'आराम हराम आहे', 'लक्ष्मी', 'लक्ष्मीची पावलं',' देवता', 'गोंधळात गोंधळ', 'मुंबईचा फौजदार', असे रविंद्र महाजनी यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत.
सुबोधचे चित्रपट
काही महिन्यांपूर्वी सुबोधचा फुलराणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमधील सुबोधच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच तुला पाहते रे या मालिकेमधून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीस आला.
संबंधित बातम्या