(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड; पुण्यातील घरात आढळला मृतदेह
Ravindra Mahajani Death : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
Ravindra Mahajani Death : मराठीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचा मृत्यू झाला आहे. 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी शेजाऱ्यांनी रविंद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, रविंद्र महाजनी राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी पोलिसांना रविंद्र महाजनी यांच्या मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात व्यक्त केला जात आहे.
रविंद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) मुंबईत राहतो. पोलिसांनी त्याला सर्व माहिती दिली असून तो तात्काळ पुण्यात दाखल झाला. रविंद्र महाजनी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीकडे सोपवण्यात येणार आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती मिळत आहे. तळेगाव ग्रामीण रुग्णालयात रविंद्र महाजनींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून ते एकटेच इथं राहत होते. भाड्याने हा फ्लॅट त्यांनी घेतला होता. मात्र शुक्रवारी सायंकाळी अचानकपणे त्याच्या घरातून दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. पोलिसांनी घराचे दार तोडून प्रवेश केला तेंव्हा ते मृतावस्थेत आढळले. सर्व परिस्थिती पाहिली असता 2-3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.
पाहा व्हिडीओ : अभिनेते रवींद्र महाजनी कालवश
'मुंबईचा फौजदार'मधून घराघरात पोहोचले महाजनी
रवींद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 1975 मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी (1978), दुनिया करी सलाम (1979), गोंधळात गोंधळ (1981), मुंबईचा फौजदार (1985) हे चित्रपट विशेष गाजले. रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी 1997 साली प्रदर्शित झालेल्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तसेच, या चित्रपटाची निर्मीतीही त्यांनीच केली होती.