IANS- MATRIZE Survey: तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार की नाही? ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
maharashtra vidhan sabha election opinion poll: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा ओपिनियन पोल. IANS- MATRIZE Survey
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार निर्णायक टप्प्यावर पोहोचला असताना IANS- MATRIZE Survey या ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला विधानसभेला महाराष्ट्रात मोठे यश मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, IANS- MATRIZE सर्व्हेच्या निष्कर्षानुसार यंदा राज्यात महायुतीची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असूनही सत्तेपासून वंचित राहावे लागेल, अशी चिन्हं दिसत आहेत.
IANS- MATRIZE Surveyच्या आकडेवारीनुसार, विधानसभा निवडणुकीत महायुतीला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून 106 ते 126 जागा मिळू शकतात. लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. मात्र, ओपिनियन पोलनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुती विदर्भात कमबॅक करताना दिसत आहे. विदर्भात महायुतीला 48 टक्के मतांसह 32 ते 37 जागांवर विजय मिळेल. तर महाविकास आघाडीला 21 ते 26 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा फिका पडणार?
लोकसभा निवडणुकीपासून शरद पवार यांना प्रचंड सहानुभूती मिळताना दिसत आहे. लोकसभेला शरद पवार गटाने 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळवला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा स्ट्राईक रेट लक्षात घेता विधानसभेला त्यांना खूप मोठे यश मिळेल, अशी चर्चा होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी भाजपमधील अनेक मोठे नेते गळाला लावले होते. त्यामुळे पवारांची ताकद वाढली होती. त्यामुळे शरद पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड यश मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, IANS- MATRIZE Surveyच्या आकडेवारीनुसार पश्चिम महाराष्ट्रात तुतारी फारशी जोरात वाजणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
IANS- MATRIZE ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या 70 जागांपैकी 31 ते 38 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय होईल. तर महाविकास आघाडीला 29 ते 32 जागा मिळू शकतात. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या तुतारीचा जोरदार चर्चा असताना विपरीत निकाल आल्यास शरद पवार यांचा करिष्मा फेल ठरला, असे म्हणावे लागेल.
IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलसाठी 10 ऑक्टोबर ते 9 सप्टेंबर या काळात सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात 1,09,628 लोकांशी बोलून त्यांची मतं नोंदवण्यात आली. यामध्ये 57 हजार पुरुष, 28 हजार महिला आणि 24 हजार तरुणांचा समावेश होता.
आणखी वाचा