Maharashtra Polls IANS- MATRIZE Survey: मुंबईत ठाकरे गटाला फटका, भाजप-शिंदे गट आघाडीवर; मनसेला किती जागा मिळणार?, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
Maharashtra Polls IANS- MATRIZE Survey: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना IANS-MATRIZE च्या सर्व्हेची आकडेवारी समोर आलेली आहे.
Maharashtra Polls IANS- MATRIZE Survey: गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचदरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना IANS-MATRIZE च्या सर्व्हेची आकडेवारी समोर आलेली आहे. यामध्ये मुंबईतील 36 जागांवर कोण बाजी मारणार याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट एकूण 22 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. तर काँग्रेस मुंबईत 11 जागांवर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून 2 जागा लढवल्या जात आहेत. तर समाजवादी पक्षाचा एक उमेदवार महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात आहे. तर महायुतीकडून भाजप 17 जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवसेना शिंदे गट 16 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवर निवडणूक लढवत आहे. तसेच मानखुर्दच्या जागेवर अजित पवार गटाने नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून सुरेश पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे.
मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळणार?
महाविकास आघाडीत मुंबईत सर्वाधिक जागा लढवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 5-9 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 4-8 च्या दरम्यान जागा मिळू शकतात. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 0-4 च्या दरम्यान जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समाजवादी पार्टीला 0-4 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीला मुंबईत 41 टक्के मतं मिळू शकतात तर त्यांना 10-13 दरम्यान जागा मिळतील, असा अंदाज IANS- MATRIZEचा आहे. महायुतीमध्ये भाजपला 13-17 दरम्यान जागा मिळू शकतात, असा अंदाज IANS- MATRIZE नं वर्तवला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत 7-11 च्या दरम्यान जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1-5 च्या दरम्यान जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीला मुंबईत 21-26 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीला 47 टक्के मिळू शकतात, असा सर्व्हेचा अंदाज आहे. मुंबईत मनसेला 0-4 दरम्यान जागा मिळू शकतात आणि इतरांना 0-4 जागा मिळू शकतात, असा अंदाज IANS- MATRIZE नं वर्तवला आहे.