Nashik Bribe Crime : जमिनीचा नकाशा काढून देण्याच्या मोबदल्यात मागितली चार लाखांची लाच, भूमी अभिलेखचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात
Nashik Bribe Crime : जमिनीच्या हद्दी खुणा दाखवून नकाशा काढून देण्याच्या मोबदल्यात चार लाखांची लाच मागणाऱ्या भूमी अभिलेखच्या शिपायास एबीसीने रंगेहाथ पकडले आहे.

Nashik Bribe Crime : जमिनीच्या हद्दी खुणा दाखवून नकाशा काढून देण्याच्या मोबदल्यात भूमी अभिलेखचे अधीक्षक आणि स्वतः साठी चार लाखांची लाच (Bribe) मागून साडेतीन लाख रुपये स्वीकारताना भूमिअभिलेखच्या शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. नितेंद्र काशीनाथ गाढे (रा. निफाड) असे या शिपायाचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या मावशीची मौजे दिक्षी, तालुका निफाड येथे शेतजमीन असून, ही शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमिअभिलेख कार्यालय निफाड येथे दिनांक 25 जानेवारीला अर्ज केला होता. तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या जमिनीची भूमी अभिलेख कार्यालय यांच्यामार्फत दिनांक 28 फेब्रुवारीला मोजणी झाली होती. परंतु हदी खुणा दाखवायच्या बाकी होत्या.
भूमी अभिलेखचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात
शिपाई गाढे यांनी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक भाबड यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाहून भावड यांच्याशी बोलून हे काम दिलेल्या तारखेस दिनांक 07 मार्च 2025 रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात दिनांक स्वतः साठी व भावड यांच्या नावे 4 लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती साडेतीन लाखांवर तडजोड केली. याबाबत तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला असता लाचेची रक्कम स्वीकारताना शिपायाला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक मीरा कौतिका वसंतराव आदमाने, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
वृद्ध महिलेला तीन लाखांना गंडा
पोलीस असल्याची बतावणी करत एका वृद्ध महिलेला रस्त्यात अडवत तिच्या हातातील साडेतीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या दोन दुचाकीवरून आलेल्या चौघा भामट्यांनी लंपास केल्या. मालेगाव तालुक्यातील चिंचगव्हाण शिवारात हा प्रकार घडला. कळवाडी येथील मंगल शिवाजी खैरनार (60) या चिंचगव्हाण शिवारात कामानिमित्त पायी जात होत्या. याचदरम्यान त्यांच्या पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या चौघा अनोळखी भामट्यांनी त्यांना रस्त्यात अडवत आम्ही पोलीस आहोत, पुढे एका महिलेचा खून झाला आहे. तुम्ही अंगावर दागिने घालून जाऊ नका, असे सांगून त्यांना त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून त्या त्यांच्याजवळील पिशवीत ठेवण्याचे नाटक करत या बांगड्या नकळत लंपास केल्या. यानंतर हे चौघे भामटे दुचाकीवरून मालेगावकडे पळून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खैरनार यांनी नातेवाईकासमवेत तालुका पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात फिर्याद दिली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
