BLOG | भय इथले संपत नाही...
राज्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियान राबवून घरोघरी जाऊन संशयास्पद रुग्ण शोधून, त्यांना लागलीच उपचार देणार आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश यावे आणि नागरिकांचा जीव वाचावा हेच अपेक्षित आहे.
नागरिकांना कोरोनाची लागण पुन्हा होऊ लागली आहे, हे रीइन्फेक्शन आहे कि जुनाच कोरोनाचा विषाणू पुन्हा फुफ्फुसांवर हल्ला चढवत आहे का? याची तपासणी करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. आयसीयू बेड्सची कमतरता राज्यातील विविध भागात जाणवत आहे. प्राणवायूचा (ऑक्सिजन) तुटवडा आहेच, अत्यावश्यक असणाऱ्या औषधाची टंचाई भासताच आहे. यापूर्वी रुग्ण दाखल करताना ऍम्ब्युलन्स मिळत नव्हती, आता मृतदेह स्मशानभूमीत नेण्याकरता ऍम्ब्युलन्स मिळत नाहीए. दिवसागणिक कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्येत सातत्याने होणारी वाढ थांबणार कशी? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्यांना हवी आहेत. रुग्णांचे हाल होत आहे. अनेक रुग्ण तडफडून मरत आहेत. सगळी व्यवस्था मुर्दाड झाली आहे. लोकांनाही कळत नाही आपण हळूहळू 'विचार' करण्याचे बंद होत चालले आहोत. विचार सध्या डोक्यात भरवला जातोय. त्याच विचाराच्या नशेत दिवस जातोय. मेंदूवर इतक्या वेळा असबंधित गोष्टी आदळत आहेत कि त्याच गोष्टी महत्वाच्या वाटायला लागत आहे. मेंदू गहाण ठेवून विचार करतोय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या आजारामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे, या प्रश्नावर बोलते व्हा. परिस्थिती भयावह होत चालली आहे. अजगराप्रमाणे, हा कोरोना हळूहळू लोकांना गिळतोय. त्याची संख्या वाढत आहे. किती नागरिक मेल्यावर व्यवस्थेला जाग येणार आहे.
या राज्यातील प्रत्येक रात्र वैऱ्याची आहे. अनेकजण साखर झोप घेत आहे. मात्र त्याचवेळी काही नातेवाईक आपल्या जवळच्या कोरोनाबाधित रुग्णाला बेड मिळावा म्हणून धावपळ करत आहेत. अनेकांना कॉल (दूरध्वनी ) करून विनवण्या करीत आहेत. ओळख काढून रुग्णांसाठी बेडची शोधाशोध करीत आहेत. प्रत्येकाला यश मिळेल असे नाही काही नातेवाईक या व्यवस्थेसमोर हतबल होताना दिसत आहे. आरोग्य व्यवस्था त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने करत आहे. डॉक्टर रुग्ण तपासून उपचार करत आहेत. मात्र या सगळ्या प्रक्रियेत प्रत्येक रुग्णाला न्याय मिळतोच असे नाही. अनेक रुग्ण आजही शासनाच्या आरोग्य व्यवस्थेवर विसंबून आहेत. काही नातेवाईकांचे रुग्ण व्हेंटिलेटर आहेत, ते तो रुग्ण बरा व्हावा म्हणून देवाच्या धावा करीत आहेत. तर काही नातेवाईक व्हेंटिलेटर मिळावा म्ह्णून देवाचा जप करीत आहेत. अत्यंत भीतीदायक वातावरण सध्या राज्यात निर्माण झाले आहे. राज्यकर्ते त्यांना ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या करीत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्याही लक्षात आलेले आहे, असे मानण्यास हरकत नाही. रात्रं-दिवस नागरिकांची सुरक्षा करणारे पोलीस बांधवाना कोरोनाने चांगलेच बाधित केले आहे, तशीच परिस्थिती आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्याची आहे. एका मागून एक रोज आघात होत आहेत. शेकडोच्या संख्येने कुटुंबातील सदस्य रोज मृत्युमुखी पडत आहे. अनेक नागरिकाचं 'अवसान' गळून पडलं आहे.
मुंबई शहरात काही रुग्णांना पुन्हा कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये एक म्हणजे ज्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला आहे आणि पुन्हा कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे आहे. त्या व्यक्तीच्या नमुन्यात ज्या आधीच्याच विषाणू पासून कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकीच एखादा जुना विषाणू शरीरात कुठेतरी आतड्यांमध्ये राहिला असेल आणि त्याने पुन्हा डोकं वर काढले असेल तर त्या संसर्गाला जुना संसर्ग उफाळून येणे (रीऍक्टिव्हेशन) असे म्हणतात, याच्या आणखी काही शक्यता असू शकतात. तर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर पुन्हा कोरोना झाला असे म्हणायचे असेल तर त्याला अगोदर झालेल्या कोरोनाचा विषाणू आणि आता पुन्हा चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतरचा विषाणू वेगळा असणे अपेक्षित आहे म्हणजेच त्या विषाणूत काही जनुकीय बदल आढळून आले असतील तर त्या व्यक्तीला पुनर्संसर्ग (रीइन्फेक्शन) झाले आहे असे म्हणतात. याकरिता या पुन्हा कोरोना झालेल्यां या रुग्णांचे नमुने अधिक तपासणी करिता पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहे.
राज्यातील बहुतांश भागात मात्र विशेष करून पिंपरी, पुणे, सांगली, नाशिक आणि नागपूर या शहरात रोज आय सी यू बेड्स मिळविण्याकरिता रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग कायम आरोग्य व्यवस्था वाढवत आहोत असेच सांगत असतो ती व्यवस्था या नागरिकांपर्यंत का पोहचत नाही हेच कळायला मार्ग नाही. राज्यातील आरोग्य व्यवस्थेला आता आणखी परिश्रम घेण्याची गरज आहे. उठ-सुठ प्रत्येक जण या विभागाच्या नावाने खडे बोल सुनावत आहे. मुंबई शहरातील कोरोना नियंत्रणाच्या वाटेवर असताना काही दिवसांपूर्वी या शहराच्या रुग्णसंख्येत चांगलीच वाढ दिसून आली आहे. त्यामुळे शहरातही रुग्णलयात आय सी यू बेड्स मिळविण्याकरिता प्रतीक्षा करावीच लागत आहे. शासनाने निर्माण केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांवर (जंबो फॅसिलिटीवर) अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचा विश्वास नाही रुग्ण जोपर्यंत स्थिर आहे. तोपर्यंत रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची कोणतीही तक्रार नसते. पण रुग्ण थोडाही 'डाउन' झाला तर त्यांना खासगी रुग्णालयात शिफ्ट करावे अशी नातेवाईकांची इच्छा असते. आजही लोकांचा रुग्णालयांवरच अधिक भरोसा आहे. पुणे शहरातील परिस्थिती भयाण झाली आहे. अनेक ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी शहरांकडे धावत आहेत. ग्रामीण भागात आरोग्याच्या व्यवस्था तोकड्या पडत आहे. त्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.
प्राणवायूची टंचाई हा एक स्वतंत्र विषय आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच भाष्य केलेले आहे. वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80% व उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील.यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60% आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50 % या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा. आता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात कायद्यान्वये बदल करून पुरवठ्याचे प्रमाण 80% वैद्यकीय क्षेत्रासाठी तर 20%उद्योगांसाठी असे करण्यात आले. कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू हा उपचाराचा भाग म्हणून मोठे योगदान देत आहे. कारण या कोविड-19 या विषाणूमुळे होणाऱ्या आजरात घशावाटे फुफ्फुसांवर हल्ला होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकाराना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील ऑक्सिजन घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासते. एस पी ओ 2, या चाचणीद्वारे शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. या आणि अन्य मापदंडानुसार डॉक्टर रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यायचे कि नाही ते ठरवतात. काही कोविडबाधित रुग्णांना फुफ्फुसाचे आजार होत असल्यामुळे या रुग्णांमध्ये ऑक्सिजन लागण्याची शक्यता जास्त असते. विशेष म्हणजे व्यवस्थित वेळेवर उपचार घेतल्यामुळे रुग्ण उपचार घेऊन बरे होत आहे.
गेल्या काही महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या उपचारात रेमेडिसिवीर आणि टॉसिलीजुम्याप या दोन औषधांचा होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र ही औषधे मिळविण्याकरिता अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना पायपीट करावी लागत आहे. काही दिवसापूर्वी हि औषधे सहजगत्या मिळत होती. मात्र काही पुन्हा हि औषधे मिळेनाशी झाली आहेत. गंभीर स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वाचविण्याकरिता ही औषधे चांगलं काम करीत असल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र या औषधांची टंचाई जाणवू लागल्याने काही लोकांनी हि औषधे त्यांच्या रुग्णांसाठी काळ्या बाजाराने म्हणजेच अधिकचे पैसे देऊन खरेदी केले आहेत. या औषधांचा मुबलक साठा राज्यात असणे अपेक्षित आहे, मात्र तसे चित्र सध्या तरी दिसत नाही. अनेक वेळा हि औषधे रुग्णांना घेणे परवडत नाही. याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग काही वेगळे प्रयत्न करताना दिसत आहे, त्यामुळे नागरिकांचा या औषध खरेदीचा ताण हलका होऊ शकेल. विशेष म्हणजे काही रुग्णांना प्लास्मा थेरपीचा फायदा होत आहे, मात्र तितके प्लास्मा दान होत नसल्यामुळे याची कमी जाणवत आहे.ऍम्ब्युलन्स खरी तर छोटी गोष्ट वाटू शकते पण त्या ऍम्ब्युलन्सची कमतरता सध्या राज्यातील सगळ्याच भागात जाणवत आहे. खासगी ऍम्ब्युलन्सधारकांनी तर मनाला सांगत आहे अनेकवेळा ती पण मिळत नाही अशी परिस्थिती आहे. अनेक वेळा या रुग्णांना वेळेत दाखल होण्यास विलंब होत आहे, हे झालं रुग्ण वाचविण्याकरिता. मात्र रुग्ण दगावल्यावरही त्या रुग्णाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णलयात येत नाही 8-9 तास मृतदेह तसेच शवागारात पडून असतात. अशा या कोरोना काळात रुग्ण दगावल्यावर जवळचे नातेवाईक अंत्यविधीसाठी फारसे येत नाहीत. त्यात रुग्णवाहिकेची अडचण यामुळे त्या रुग्णांच्या नातेवाईकाला धावपळ आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यात स्मशानभूमीत गेल्यावर अनेक वेळ वाट पाहावी लागत आहे, कारण अनेक मृतदेह रोज अंत्यविधीसाठी स्मशानात येत आहेत. शासनाने ऍम्ब्युलन्स या विषयावर तात्काळ तोडगा काढणे आवश्यक आहे.
बुधवारी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांच्या अनुषंगाने जी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार 23 हजार 816 नवीन रुग्णांचे निदान राज्यात एकाच दिवशी झाले असून 325 कोरोनबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस राज्यातील परिस्थिती भयानक होत चालली असून ती आटोक्यात आणण्याकरिता विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे राज्य शासन लवकरच, संपूर्ण राज्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियान राबवून घरोघरी जाऊन संशयास्पद रुग्ण शोधून, त्यांना लागलीच उपचार देणार आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश यावे आणि नागरिकांचा जीव वाचावा हेच अपेक्षित आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | लक्षणविरहित रुग्णाचं काय?
- BLOG | कोरोनाबाधितांची ओळख परेड?
- BLOG | कोरोनामय 'डायबेटिस'
- BLOG | संपता संपेना... कोरोनाकाळ
- BLOG | कोरोनाची वक्रदृष्टी पुरुषांवर अधिक!
- BLOG | व्यर्थ न हो बलिदान...!
- BLOG | कोरोना विरोधी लोकचळवळ!
- BLOG | पुणे करूया 'उणे'
- BLOG | नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन ... एक आव्हान
- पुणेकरांनी अधिक सजग राहावे!