Bugonia Movie Review: बुगोनिया : पृथ्वीला माणसाची खरंच गरज आहे का?

Bugonia Movie Review: गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये एक जोरदार संघर्ष सुरू आहे. अर्धकुंभसाठी शेकडो झाडं तोडण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्याविरोधात निसर्गप्रेमीच नव्हे तर सर्वसामान्य लोक ही पेटून उठलेत. दरी-खोऱ्यात राहुट्यांमध्ये राहणाऱ्या साधु-संतांसाठी झाडांची कत्तल का? असा साधा प्रश्न विचारण्यात येतोय. सध्या आपण सर्वजण विचित्र परिस्थितीत राहतोय. कधी ही पाऊस पडतो. तापमान वाढतंय. शहरातली हवा खराब झालीय. डोंगर फोडतोय, जंगलं कापतोय. माणसाची हाव कधी थांबणार?हा खरा प्रश्न आहे. पण त्याहून ही मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पृथ्वीवर माणसाची खरंच गरज आहे का? माणूस हा सर्वात हुशार प्राणी तयार तर झाला, पण त्यानं निसर्गाचा नाश करायला सुरुवात केली. त्याची ही भुक कधी आणि कुठे थांबणार? पुढच्या पिढीसाठी आपण सर्व काही करतोय हे छातीठोक पणे सांगणारा माणूस मग तो प्रगत राष्ट्रातला असो किंवा मग अगदी गरीब देशातला पुढच्या पिढीसाठी कुजलेली हवा आणि सडलेलं पाणीच सोडून जातोय. असं असेल तर माणसाचं अस्तित्व खरंच गरजेचं आहे का?

स्टॅनली कुब्रिक या दिग्दर्शकानं 2001 - ए स्पेस ओडिसी (1968) हा सिनेमा बनवला. तो सर आर्थर सी क्लार्क यांच्या सायन्स फिक्शनवर आधारीत होता. गोष्टींमध्ये आणि सिनेमातही मोनोलिथ दिसतं. त्याचं आणि पृथ्वीतळावरच्या माणसाचं कनेक्शन आहें. हे मोनोलिथ म्हणजे एलियन्सनी माणसाच्या मार्गदर्शनासाठी तयार केलेली काळी भिंत आहे. We are Property असं आर्गुमेन्ट सिनेमात करण्यात आलंय. म्हणजे काय तर माणसाचं अस्तिव एलियन्सनी तयार केलंय. एलियन्सनं काही प्रयोग केले माणूस हा त्यापैकी एक आहे. असं काहीसं क्लिष्ट आर्गुमेन्ट सिनेमात आहे. पाच सेकंदाच्या दृश्यांमध्ये माणसाची हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचा विचार स्टॅनली कुब्रिकनं मांडला. शस्त्र हातात आलं आणि माणूस हिंसंक झाला. आदिकाळातल्या हाडापासून सॅटेलाईटपर्यंत माणसाच्या शस्त्रांची प्रगती होत राहिली. ज्या निसर्गात त्याची निर्मिती झाली त्या निसर्गालाच तो संपवायला निघालाय. स्टॅनली कुब्रिकच्या या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम बुगोनिया (2025) या नव्या सिनेमात करण्यात आलंय. दिग्दर्शक योगोस लांथिमोस (पुअर थिंग्स, द फेवरेट फेम) या प्रयोगशील दिग्दर्शकानं पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केलाय. पृथ्वीवर माणसाची खरंच गरज आहे का? माणसाशिवाय पृथ्वीवर जीवसृष्टीचं अस्तित्व राहिल का? याचं उत्तर होय असं असेल असा दावा योगोसनं केलाय. आणि त्यासाठी त्यानंही एलियन्सच्या कथानकाची मदत घेतलीय.

आता बुगोनिया म्हणजे नक्की काय? ग्रीक आणि रोमन मिथकांमध्ये बुगोनिया हा शब्द वापरण्यात येतो. जेव्हा एखादा प्राणी मरतो तेव्हा नैसर्गिकरित्या त्यात किडे पडतात. शरीर सडकं, संपतं आणि त्यातून किडे-माश्या नवा जन्म घेतात. मृत्यूतून नवं जीवन तयार होतं, हाच विचार बुगोनिया सिनेमात आहे. माणसानं विकासाच्या नावावर तयार केलेली संस्कृती संपुर्ण उध्वस्त झाली आणि माणूस कायमचा नष्ट झाला तरी निसर्ग तसाच कायम राहिल. असा विचार सिनेमात आहे.
दिग्दर्शक योगोस लांथिमोसनं हे सर्व दाखवण्यासाठी जे कथानक तयार केलंय ते अगदी भन्नाट आहे. दोन वेडसर मित्र एका मोठ्या कंपनीच्या सीईओचं अपहरण करतात. का तर ती एलियन आहे आणि हे एलियन आपल्याला संपवणार अशी त्यांची कॉन्परेसी थिएरी असते. या अपहरणानंतर कथानकात जे घडतं ते भयंकर, विचित्र आणि अनाकलनीय आहे. एक गोष्ट दिग्दर्शक योगोस लांथिमोस ठाम पणे सांगतो की ‘’व्युई आर प्रॉपर्टी’’ म्हणजे या विश्वाची निर्मिती एलियन्सनं केलेली आहे. आपण कटपुतली आहोत ते कधीही आपल्याला नष्ट करु शकतात. माणूस नष्ट झाला तरी पृथ्वीला काहीही फरक पडणार नाही. सुर्य रोज उगवेल, प्राणी गुण्यागोविदानं राहतील आणि जंगल वाढत राहिल.

आज नाशिकात आंदोलन चालू असताना बुगोनिया सारखा सिनेमा येणं हा योगायोग मानावा लागेल. झाडं आपल्याला चांगली हवा देतात. त्यांची कत्तल करायची, त्यांच्या जागेवर व्हिआयपी लोकांसाठी तंबु ठोकायचे, साधुसंतांच्या नावाखाली जमीन रिकामी करायची आणि नंतर ती जागा बळकावायची. हा स्टँडर्ड राजकीय पॅटर्न नाशिकच्या अर्धकुंभाच्या निमितानं दिसतोय. ते काय करतायत हे त्यांना खरंच कळत असेल का? ते कधी शिकतील? हे बुगोनियातलं शेवटचं गाणं नाशिकच्या झाडांच्या कत्तलींना चपखळ लागू पडतं.
सिनेमात मधमाशीचा प्रतिक म्हणून वापर केला गेलाय. मधमाशी मध गोळा करते, माणसं तिचा पोळ्यातून मध चोरतात, त्यांना हाकलून लावतात, पण तरीही मधमाशी आपलं काम करत राहते. ती एका फुलांवरुन दुसऱ्या फुलांवर बागडत राहते. तिचं असं हे करणं नैसर्गिक आहे. निसर्गाची वाट लावणाऱ्या माणसाला एलियन्सनी मारुन टाकलं तर. खरं तर माणूसच स्वत:ला तसं मारुन टाकण्याची सोय करतोय. एलियन आपल्या कल्पनेत आहेत. झाडांच्या कत्तलीतून ऑक्सिजन मारला जातोय. निसर्गाचा समतोल बिघडवला जातोय. मग एक दिवस सर्व ऑक्सिजन संपून सर्वजण मरतील, पृथ्वी नव्यानं जन्मेल आणि तेव्हा माणसाची गरज लागणार नाही. निसर्ग कायम आहे. माणूस संपणारा प्राणी आहे. निसर्ग शास्वत आहे. हे आपल्या राजकारण्यांनी लक्षात ठेवलं तर आपण आणखी काही वर्षे चांगलं सुखानं जगु शकू. बिगोनिया सिनेमा बघताना हेच विचार मनात येतात.

























