Left-Handed Girl Movie Review: लेफ्ट हँडेड गर्ल - तिघींची गोष्ट आणि एक सिक्रेट

Left-Handed Girl Movie Review: सध्या लेफ्ट हँडेड गर्ल (2025) या तैवानच्या सिनेमाची ज़ोरदार चर्चा आहे. शिन चिंग त्सूनं तब्बल 20 वर्षांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. हा सिनेमा आयफोनवर शूट झालेला आहे. तेपे या राजधानीच्या शहरात घडणारी ही गोष्ट फेमिनिस्ट नॅरेटिव्ह म्हणजे उत्तम स्त्रीवादी कथानक आहे. यापुर्वी 2004 मध्ये टेक आऊट (2004) हा सिनेमा शीन बेकर आणि शिन चिंग त्सू दोघांनी मिळून दिग्दर्शित केला होता. त्यानंतर फ्लोरिडा प्रोजेक्ट (2017) पासून ऑस्कर विजेता अनोरा (2024) पर्यंतच्या शीन बेकरच्या सर्वच महत्त्वाच्या सिनेमांच्या निर्मितीत शिन चिंग त्सू होती. 20 वर्षांनी दिग्दर्शनाकडे पुन्हा वळताना तिने आपल्या शहराची म्हणजेच तेपेची निवड केलीय.
एक सिंगल मदर, तिच्या दोन मुलींना घेऊन गावाकडून तेपेमध्ये येते. मोठी मुलगी इएन 20 वर्षांची आणि लहान मुलगी इजिंग 5 वर्षांची. या तिघांचं एक सिक्रेट आहे. जे सिनेमाच्या शेवटी उलगडतं. पण तिथपर्यंत पोचेपर्यंत शिन चिंग त्सू या कुटुंबाची आर्थिक, सामाजिक बाजू दाखवते. तेपेसारख्या शहरात रात्रीच्या मार्केटमध्ये रामेनचा एक स्टॉल लावून हे कुटुंब गुजरान करतंय. हाता-तोंडाची मारामारी आहे. यातून मग जगण्याचा संघर्ष सुरु होतो. पाच वर्षांच्या इजिंगलाही या आर्थिक परिस्थितीची जाणिव आहे. या सर्व परिस्थितीकडे पाहण्याचा तिचा एक दृष्टीकोन आहे. ती आई आणि ताईला हातभार लावते. ती डावखुरी आहे. डावा हात म्हणजे सैतानाचा हात. सर्व वाईट कामं डाव्या हातानं केली जातात. हे असं तिला सतत सांगण्यात येते. आणि ती ही मग ते मानायला लागते. गोष्ट पुढे सरकते, या तिघींची सिक्रेट बाहेर येतं आणि मग हंगामा होईल असं प्रेक्षकांना वाटतं. पण तसं काहीच घडत नाही. निम्न मध्यमवर्गाची एक खासियत असते. त्याचा जगण्याचा संघर्ष इतका मोठा असतो. त्यामुळं आलेल्या छोट्या-मोठ्या संकंटांकडे तो दुर्लक्ष करतो. जस्ट गो विथ फ्लो नुसार परिस्थितीशी जुळवून घेतात. शिन चिंग त्सूच्या सिनेमात ही जुळवून घेण्याची प्रक्रिया 5 वर्षांच्या इजिंगच्या नजरेतून घडते. ती या सिनेमाची खरी हिरॉईन आहे.
अनेकदा मुलं वयाआधीच जाणती होतात. आपल्याकडे पैसे नाहीत, हे पाचव्या वर्षीच इजिंगला समजलं आहे. त्यामुळं हसण्या-बागडण्याच्या वयात ती आईला रामेन स्टॉलवर मदत करते. इजिंगमुळं त्या स्टॉलरची गर्दीही कायम राहते. कुठलीही बचत नाही, कर्जाचा डोंगर, पैश्यांची चणचण आणि त्यातून आलेली असुरक्षितता हे वया पाचव्या वर्षी अनुभवायला मिळणारी इजिंग या वातावरणाशी जुळवून घेतेय. प्रत्येकाला तिच्या डावखुऱ्या असण्याबद्दल प्रॉब्लेम आहे. आपण डावखुरे आहोत म्हणजे काही तरी भंयंकर घडलंय असंच तिला वाटत राहते. वाईट डाव्या हाताने वाईट काम करायला लागते. हा तिचा बाल मानसशास्त्रीय दृ्ष्टीकोन शिन चिंग त्सूनं चांगला हेरलाय.
शिन चिंग त्सूनं सिनेमातून तैवानमधल्या पुरुष प्रधान समाजावर भाष्य केलंय. बाई ही प्रत्येक कुटुंबाचा कणा असते. पण पिढ्यानपिढ्या झालेल्या संस्कारांमुळं, सामाजिक बांधणीमुळं ती पुरुषाच्या अधिपत्त्याखाली राहणं पसंत करते. म्हणून कर्तुत्ववान आईला मुलींपेक्षा मुलाचा अभिमान जास्त असतो. मुलाचं यश हे आईचं यश बनत. मुलींच्या संघर्षांला, यशाला प्राथमिकता नसते. घर ‘त्याचं’ असतं, ‘तिचं’ त्यातलं अस्तित्व दुय्यम असतं. हे पिढ्यानपिढ्या सुरु आहे. तैवानसारख्या छोट्याश्या देशात ही परिस्थिती आणखी बिकट असते. म्हणजे महिलेला सामाजिक स्थान आहे. जेव्हा घर चालवण्याचा, कुटुंबाच्या अभिमानाचा विषय येतो तेव्हा तो अधिकार मुलाकडे जातो. जर काही वाईट आणि लपवण्याजोगं घडत असतं ते मुलींचं असतं. हा थॉट घेऊन बनवलेला लेफ्ट हँडेड गर्ल (2025) पुरुषप्रधान समाजावर आसूड ओढतो.
कॅन फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्रिटिक्स विक विभागात लेफ्ट हँडेड गर्ल (2025) सिनेमाची वर्णी लागली. त्यानंतर तो सर्वच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पसंतीचा ठरला. एका सिंगल मदरच्या गोष्टीकडे सहानभुतीपुर्वक पाहण्याजोगा हा सिनेमा झाला असता. पण शिन चिंग त्सूने त्याला ह्युमरस केलाय. सिनेमाची मांडणी अशी ह्युमरस असल्यानं शेवटाकडे सिक्रेट उलगडण्याच्या दिशेने पुढे जातो त्या प्रक्रियेत प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्यात शिन चिंग त्सू यशस्वी झालीय. पुर्व आशियातल्या तो महत्त्वाचा सिनेमा ठरलाय.

























