BLOG | कोरोनाबाधितांची ओळख परेड?
कोरोनाकाळात आपणास काही माणुसकीची उदाहरणे दिसली आहे तर काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना या राज्यात घडल्या आहेत. काही ठिकाणी तर कोरोनाबाधित कुटुंबियाला वाळीत टाकल्याचे प्रकारही घडले आहेत
साथीच्या आजारात नव्हे तर इतर कोणत्याही आजारात एखाद्या आजारी व्यक्तीची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करणे हे वैद्यकीय व्यवसायात तत्वाला धरून नाही. एखाद्या आजाराची नोंद शासनाकडे करणे ज्यावेळी करणे बंधनकारक असते त्याचवेळी वैद्यकीय व्यवसायक त्याची नोंद शासनाने नेमून दिलेल्या विभागास कळवीत असतात. डॉक्टरांना नियम आणि तत्वे आखून दिली आहेत. मात्र, सर्व सामान्य जनतेचं काय? आज उठ सुठ कुणीही लुंग्या-सुंग्या उठतो आणि कोरोनबाधित रुग्णांची माहिती समाज माध्यमांवर जाहीर करतो. या सर्व प्रकारामुळे त्या रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियाला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. अनेकांना आपल्याला एखादा आजार आहे याची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करायची नसते, त्याची शासकीय नोंद होणे हा वेगळा भाग आहे. आज पर्यंत आपण पाहिलं असेल अनेक रुग्णांची माहिती जाहीररीत्या त्या रुग्णाच्या इच्छेविरुद्ध, सामाजिक माध्यम, सर्वच वृत्तवाहिन्या आणी वृत्तपत्रे यामध्ये जाहीर करत आहे, याला कुठे तरी आळा बसणे गरजेचे आहे. या उलट काही रुग्णांना स्वतःहून त्या आजाराच्या जनजागृतीबाबत माहिती जाहीर करायची असते. हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे.
याप्रकरणी सतेज पाटील, गृह राज्यमंत्री, सांगतात की. "अशा पद्धतीने एखाद्या रुग्णाची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करणे चुकीचे आहे. याप्रकरणी, मागेच केंद्राच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अशा पद्धतीने रुग्णांची माहिती जाहीर करू नये असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेने याचे कटाक्षाने पालन केले पाहिजे, असे माझे मत आहे. एखाद्या रुग्णाला जर त्याची स्वतःची माहिती जाहीर करायचे असेल तर हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. आपल्याकडे सध्या स्वतःची वैयक्तिक माहितीची गुप्तता पाळण्याच्या अधिकाराबाबत, कोणती माहिती जाहीर करायची किंवा नाही यावर बील आणले गेले असून त्यावर सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे माझं राज्यातील सर्व सामान्य जनतेला आवाहन आहे, की कुणीही इतर नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करू नये. जर हे प्रकार असेच वाढत राहीले तर भविष्यात यावर कायदा करण्याची गरज भासू शकते."
कोविड-19, या विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या बाधित रुग्णांची नोंद ठेवणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्याला तशी वेगवेगळी शास्त्रीय करणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे हा आजार संसर्गजन्य आजार आहे. एका रुग्णांकडून तो समाजातील इतर लोकांना होऊ शकतो. त्यामुळे समाजातील लोकांना धोका संभवतो. अशावेळी त्या संबंधित रुग्णाची शासन काळजी घेऊन त्याचे अलगीकरण करून त्या रुग्णाला योग्य ते उपचार देत असते. त्याशिवाय या आजाराच्या नोंदी ठेवण्यामागे दुसरा भाग असा की या आजाराच्या वर्तनाचा अभ्यास वैद्यकीय तज्ञांना करायचा असतो. त्याची मदत त्यांना त्या आजारासंदर्भात धोरण आखताना होत असते. अनेकवेळा औषधाची उपचारपद्धती कशी असावी, कोणते औषध चालू करणे गरजेचे आहे, हे सर्व या अभ्यासातून ठरत असते. तसेच लोकांनी कशापद्धतीने काळजी घ्यावी या आणि अशा अनेक सामाजिक धोरण आखण्याकरिता शासन अशा साथीच्या आजारच्या नोंदी स्वतःकडे ठेवत असतात. त्यात कोरोना हा आजार संपूर्ण विश्वासाठी नवीन आहे, अशावेळी तर खबरदारीचा उपाय म्हणून या नवीन आजाराची सर्व नोंदी करणं हे गरजेचं आहे. वैद्यकीय शिक्षणात या सर्व गोष्टीचा फायदा हा विद्यार्थांना होत असतो.
याप्रकरणी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, सांगतात की, "एखाद्या रुग्णांची माहिती त्याच्या इच्छेविरुद्ध बाहेर जनतेमध्ये जाहीर करणे हे नीतिशास्त्राला किंवा तत्वाला धरून नाही. डॉक्टर सुद्धा केवळ, ज्या आजाराची नोंद शासनाला कळविणे बंधनकारक आहे, अशा आजारामध्येच त्या संबंधित रुग्णाची माहिती शासनाने नेमून दिलेल्या विभागाला कळवू शकतात. त्या रुग्णाची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करणे हे पूर्णपणे अयोग्यच आहे. त्या संदर्भातील माहिती डॉक्टरांसाठी आखून दिलेल्या नियमावलीत आहे. सर्व सामान्य नागरिकांनी अशा साथीच्या काळातही माहिती सार्वजनिक करणे चुकीचे आहे. या अशा वर्तणुकीमुळे रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही."
सध्याच्या या कोरोनामय काळात, काही लोकं हा आजार होऊ नये म्हणून घाबरून जगत आहे तर काही लोकं आपल्याला हा आजार झाला आहे याची दक्षता घेत आहेत आणि त्यावर उपचार घेत आहे. ज्या पद्धतीने ह्या आजाराबद्दल आपल्याकडे वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व सामान्य कुठल्याच रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबियला आवडणार नाही की आपली ही आजाराची माहिती सार्वजनिक व्हावी. काही भागात अशा रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना वाळीत टाकण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे काही लोकांमध्ये या आजाराची जबरदस्त भीती निर्माण झाली आहे. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांना किंवा सेलेब्रेटींना हा आजार झाला तर अनेक त्यांचे चाहते सहानुभूतीपूर्वक संदेश लिहितात, लवकर बरे व्हा, गेट वेल सून. मात्र, हाच आजार त्याच्या शेजारील सोसायटी मध्ये किंवा इमारतीतील, गावातील, आळीतील माणसाला झाला तर त्याचं शूटिंग काय काढतील, ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित होईल याची व्यवस्थित काळजी घेतील, जसा त्याने एखादा मोठा गुन्हा केलाय. एकमेकांमध्ये गॉसिप काय करतील, त्यांच्या कुटुंबियांना संशयानेच काय बघतील, गरज नसताना विनाकारण सल्ले काय देतील असे विविध प्रकार उभ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसात पहिले आहे.
सगळेच लोक काही वाईट असतातच असे नाही, या अशा परिस्थितीत मात्र काही ठिकाणी चांगली वागणूक रुग्ण आणि रुग्णाच्या कुटुंबियांना नागरिकांडून मिळाल्याची उदाहरणे आहेत. अनेक लोकं त्या काळात त्या कुटुंबियांना जेवण देणे, बाहेरच्या वस्तू लागत त्या आणून देणं असेही घडताना आपण सगळ्यांनीच पहिले आहे.
केइएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता सांगतात, की, "माझा या गोष्टीला पूर्णपणे विरोधच आहे की अशा पद्धतीने कुणीही कुणाच्या आजाराबद्दलची माहिती सार्वजनिक करणे हे चूकच आहे, याचं कुणीही समर्थन करणार नाही. त्यामुळे कुणीही कुणाची आरोग्याची वैयक्तिक माहित अशी समाज माध्यमामांवर टाकण्यास माझा पूर्णपणे विरोध आहे. लोकांनी सामाजिक भान जपलं पाहिजे. एखादा व्यक्ती कोरोना काही मुद्दामहून स्वतःकडे ओढवून घेत नाही. या आजाराकरिता उपचार आहेत योग्य वेळी ते केले की रुग्ण ठणठणीत बरा होतो. "
कोरोनाकाळात आपणास काही माणुसकीची उदाहरणे दिसली आहे तर काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना या राज्यात घडल्या आहेत. काही ठिकाणी तर कोरोनाबाधित कुटुंबियाला वाळीत टाकल्याचे प्रकारही घडले आहेत. शासन सर्वाना आवाहन करत आहे की एखादे लक्षण दिसल्यास घरी थांबू नका तात्काळ दवाखान्यात जाऊन त्यावर जाऊन उपचार करून घ्या. मात्र, सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या काही घटनांमुळे लोकांमध्ये या आजारांबाबत जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. काही लोक तर या आजाराच्या भीती पोटी कोणतीही वैद्यकीय चाचणी करून घ्यायला सुद्धा घाबरत आहे. ह्या सगळ्या घटना वेळीच जर थांबवायच्या असतील तर सर्व प्रथम कोरोनाबाधितांची ओळख परेड थांबविणे गरजेचे आहे, जर कुणी असा प्रकार केला तर कायद्याने ते बंधनकारक करता येईल याचा विचार शासनाने करण्याची गरज आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | लक्षणविरहित रुग्णाचं काय?