SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा कशा होणार? विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं 'माझा'वर
SSC HSC Exam : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावी परीक्षांचा कालावधी व स्वरूप निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार व मंडळामार्फत मुख्याध्यापक, विषय शिक्षक व तत्सम तज्ञांशी विचारविनिमय करूनसदर परीक्षांचा कालावधी व स्वरुप निश्चित करण्यात आले आहे. त्यासोबतच परीक्षा सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पाडण्याकरिता विद्यार्थ्यासाठी काही विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याची माहिती गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे.
परीक्षेचा कालावधी
प्रचलित पद्धतीनुसार बारावीची परीक्षा 20 फेब्रुवारी दरम्यान व दहावीची परीक्षा एक मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. तथापि चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. बारावीची लेखी परीक्षा चार मार्च 2022 ते 30 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च 2022 ते चार एप्रिल 2022 होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्च यादरम्यान होणार आहे.