108 रुग्णवाहिकेनं पुन्हा दिला दगा, गर्भवती महिलेचा ऑटोतून प्रवास; भररस्त्यातच दिला बाळाला जन्म
मुखेड तालुक्यातील मेथी गावात एका 9 महिन्याच्या गर्भवतीला घेऊन नातेवाईकानी चक्क ऑटोतून प्रवास सूरू केला, त्यावेळी प्रसुतीकळा वाढल्याने महिलेची भररस्त्यातच प्रसुती झाल्याची घटना समोर आली आहे.

नांदेड : सरकारकडून रुग्णसेवा अतिशय चांगल्या दिल्या जातात, विविध योजनांच्या माध्यमातून गरिब रुग्णांवर मोफत उपचार केले जातात, असा डंका पिटला जातो. विशेष म्हणजे, गर्भवती महिलांसाठी किंवा नुकतेच्या माता झालेल्या महिलांची देखील काळजी घेण्यात येत असल्याचे सांगितले जाते. मात्र, वस्तूस्थिती वेगळीच दिसून येते. आजही कित्येक भागात गर्भवती महिलांना (Women) चक्क झोळी करुन रुग्णालयात नेण्यात येते, किंवा गरोदर महिलांना सुविधां अभावी मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच, सरकारकडून 108 रुग्णवाहिका (Ambulance) काही मिनिटांत हजर होईल, असे सांगितले जाते. मात्र, या रुग्णवाहिकेकडून सातत्याने दगाच बसतो. नांदेडमध्ये (Nanded) पुन्हा एकदा त्याची अनुभूती आली. येथील एका 22 वर्षीय महिलेला प्रसुती वेदना सूरू झाल्यानंतर नातेवाईकानी 108 क्रमांकावर फोन केला. मात्र, रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही.
मुखेड तालुक्यातील मेथी गावात एका 9 महिन्याच्या गर्भवतीला घेऊन नातेवाईकानी चक्क ऑटोतून प्रवास सूरू केला, त्यावेळी प्रसुतीकळा वाढल्याने महिलेची भररस्त्यातच प्रसुती झाल्याची घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालूक्यातील मेथी गावातील ही घटना असून 22 वर्षीय अश्विनी नालापले यांच्यासमवेत ही घटना घडली. सुदैवाने बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहे. अश्विनी यांना आज सकाळी प्रसुतीवेदना सूरू झाल्या, त्यावेळी नातेवाईकानी रुग्णवाहिकेच्या 108 क्रमांकवर फोन केला. मात्र, नेहमीच्याच ओरडप्रमाणे रुग्णवाहिका उपलब्ध झालीच नाही. त्यामुळे, महिलेच्या वेदना वाढत असल्याने नातेवाईकांनी 9 महिन्याच्या गर्भवती महिलेला घेऊन ऑटोतून प्रवास केला. मात्र, रस्त्यातच प्रसूती कळा वाढल्याने नात्यातील महिलांनी होनवडज फाट्याजवळ ऑटो थांबवला. रस्त्यालगच्या शेतात साडीचा आडोसा देऊन गर्भवती महिलेची प्रसुती करण्यात आली. यावेळी, महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. दरम्यान, याठिकाणी आई आणि बाळाची नाळ तोडण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे, स्थानिकांनी रुग्णवाहिका मागवून तातडीने आई आणि बाळाला मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत.
आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान या घटने नंतर ग्रामीण भागातील आरोग्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण, मेथी या गावापासून येवती आणि होनवडज ही आरोग्य उपकेंद जवळ आहेत. मात्र, या केंद्रात सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे आरोग्य सेवेसाठी भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे.
हेही वाचा
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांनीच दिला पदाचा राजीनामा, भाजप प्रवेशाची तारीखही ठरली




















