पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांनीच दिला पदाचा राजीनामा, भाजप प्रवेशाची तारीखही ठरली
आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात बदलाचे वारे वाहत असून सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

पुणे : विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसला (Congress) गेल्या काही महिन्यात अनेक धक्के बसले असून पक्षातील नेते काँग्रेसला बाय-बाय करत आहेत. आता, पुणे (pune) जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला असून चक्क पुणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी आपल्या पदाचा तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. मात्र, लवकरच त्यांचा भाजप प्रवेश होणार असून 16 जुलै रोजी ते भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात बदलाचे वारे वाहत असून सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. आता, काँग्रेस नेते आणि माजी आमदार संजय जगताप यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे ई-मेलद्वारे पाठवला असून, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडेही राजीनामा पत्र सुपूर्द केला आहे. येत्या 16 तारखेला संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याआधी सोमवारी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा सासवड येथे आयोजित केलेला आहे. जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदर मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार आहेत. तर, महायुतीतील मित्र पक्षांची यावर काय भूमिका व्यक्त होते हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जगताप यांना त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीच पक्षबदलासाठी दबाव वाढवला असून, या पार्श्वभूमीवर गावबैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय जगताप यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याच निवडणुकीत शरद पवारांचे समर्थक संभाजी झेंडे यांनी बंड करत अजित पवार गटाची उमेदवारी मिळवली, यामुळे पुरंदर मतदारसंघात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. संघ परिवाराचा पाठिंबा नसल्यामुळे आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर मतविभाजन झाल्याने जगताप यांचा पराभव झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात. सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती. संजय जगताप यांनी वारंवार या बातम्या नाकारल्या. अखेर,आज त्यांनी काँग्रेसमधील आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.
हेही वाचा
ना परवाना, ना डिग्री; बुलढाण्यात गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरच्या रुग्णालयात वैद्यकीय पथकाचा छापा


















