US China Trade Deal : अमेरिका आणि चीनचे सूर जुळण्याची शक्यता, टॅरिफ घटवलं, भारताच्या कंपन्यांवर ट्रम्प यांचं सावट?
Donald Trump :डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचं अध्यक्षपद दुसऱ्या टर्ममध्ये स्वीकारल्यानंतर टॅरिफ वॉर सुरु केल्यानं जगामध्ये खळबळ उडाली.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर जगाला आयात शुल्क लादण्याचं धोरण स्वीकारत धक्के दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर टॅरिफ लादले. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वाधिक टॅरिफ चीनवर लादण्याची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सर्वाधिक टॅरिफ लादल्यानं भारताची मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये प्रमुख शक्ती होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अमेरिका आणि चीन वादात भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी मोठी संधी निर्माण झाली होती.
चीनकडून अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू निर्यात करण्याची संधी भारताला मिळाली असती. चीनवर अधिक टॅरिफ लादल्यानं अमेरिकन कंपन्या कमी टॅरिफ असल्यानं भारतात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. एपलचे सीईओ टिम कुक यांनी चालू आर्थिक वर्षात अमेरिकेत विक्री केले जाणार आयफोन भारतातून मागवले जातील असं म्हटलं गोतं.
भारत डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. भारत देखील अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लादण्याच्या नियोजनात आहे. रॉयटर्सच्या अपडेट नुसार भारत अमेरिकेच्या स्टील आणि अॅल्युमिनिअमवर टॅरिफ लादू शकतं. अमेरिकेत निर्माण झालेल्या काही वस्तूंवर देखील टॅरिफ लादलं जाऊ शकतं. भारतानं यासंदर्भात जागतिक व्यापार संघटनेकडे कागदपत्रं सोपवली आहेत.
भारतानं जागतिक व्यापार संघटनेकडे जाणं आश्चर्यकारक मानलं जात आहे. भारत आणि अमेरिका द्वीपक्षीय करारावर चर्चा करत आहेत. त्या नुसार 8 जुलैपर्यंत अंतरिम व्यवस्था निर्माण होणं अपेक्षित आहे. अन्यथा अमेरिकेला भारताकडून निर्यात वस्तूंवर 26 टक्के परस्परशुल्क लादलं जाईल.
अमेरिका-चीन व्यापार करार
अमेरिकेसोबत व्यापारी करार करणारा भारत पहिला देश ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र, अमेरिका आणि चीन यांनी टॅरिफ वॉरवरुन सुरु झालेला संघर्ष थांबवण्याची घोषणा केली. यामुळं दोन्ही देशांकडून टॅरिफ कमी करण्यावर सहमती दर्शवण्यात आली.
चीनमधून बाहेर जाणाऱ्या कंपन्या भारतात येतील अशी अपेक्षा होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी 90 दिवसांसाठी परस्परशुल्क आकारणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं अमेरिका आणि चीनमधील वाद कमी होण्यास वेळ मिळाला.
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्वीपक्षीय व्यापार कराराला उशीर होत आहे. अमेरिकेनं ब्रिटन आणि चीनवरील आयात शुल्क कमी केलं आहे. आता भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क लावण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेकडे जात आहे. यावरुन दोन्ही देशांमध्ये आलबेल नसल्याचं दिसून येतं. सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा अध्यक्ष होणं भारतासाठी फायदेशीर मानलं जात होतं. मात्र, आता परिस्थिती वेगळी दिसत आहे. भारत आणि अमेरिकेत तणाव वाढताना दिसून येत आहे.
भारत पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी करण्यासाठी मध्यस्थी केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानं नवी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि अमेरिकेत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.


















