Iran Israel War : अमेरिकेनं युद्धात उडी घेतल्यानंतर भारताकडून जुन्या मित्रासोबत संवाद, नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा, म्हणाले...
Iran Israel War : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षात अमेरिकेनं थेट उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली.

नवी दिल्ली : इस्त्रायल आणि इराण यांच्या युद्धात अमेरिकेनं उडी घेतली आहे. अमेरिकेच्या हाई दलाच्या बी-2 बॉम्बर विमानांनी काल रात्री इराणच्या तीन प्रमुख अणवस्त्र संशोधन केंद्रांवर हल्ले केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवडे युद्धात लक्ष देणार नाही, असं म्हटलं होतं. मात्र, दोनच दिवसात अमेरिकेनं इस्त्रायलच्या बाजूनं इराणवर हल्ले केले. अमेरिकेनं युद्धात उडी घेताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींसोबत चर्चा करुन शांततेच्या मार्गानं प्रश्न सोडवावा असं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींसोबत काय संवाद झाला याची माहिती सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
मी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजिशकियान यांच्यासोबत चर्चा केली. सद्याच्या स्थितीवर आम्ही सविस्तर चर्चा केली. सध्याच्या वाढत्या तणावाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. मी पुन्हा आवाहन केलं की आताची स्थिती शांत केली पाहिजे. संवाद आणि राजनैतिक चर्चेतून पुढं जाणं आवश्यक असून त्या भागात तातडीनं शांतता, सुरक्षा आणि स्थिरता बहाल करणं आवश्यक आहे, असं मोदी म्हणाले.
Spoke with President of Iran @drpezeshkian. We discussed in detail about the current situation. Expressed deep concern at the recent escalations. Reiterated our call for immediate de-escalation, dialogue and diplomacy as the way forward and for early restoration of regional…
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2025
इराणचे विदेश मंत्री सईद अब्बास अराघची यांनी अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय कायदे, यूएन नेशन चार्टर, आणि अणवस्त्र अप्रसार कराराचं उल्लंघ या हल्ल्याद्वारे करण्यात आल्याचं म्हटलं. सईद अब्बास अराघची यांनी म्हटलं क संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असलेल्या अमेरिकेनं शांततापूर्ण अणू केंद्रांवर हल्ले करणं ही गुन्हेगारी आहे. आजची घटना म्हणजे वाद वाढवण्याचा प्रयत्न आहे, याचा दीर्घकालीन परिणाम होईल.
संयुक्त राष्ट्राच्या प्रत्येक सदसय देशांनी यामुळं चिंता व्यक्त केली पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या तरतुदींचा दाखला देत अराघची म्हणाले की इराणकडे आत्मसंरक्षणाचा अधिकार असून त्याचा वापर करण्याचा पर्याय त्यांच्याकडे आहे.
इराणं म्हटलं की आमच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी पूर्ण ताकदीनं उत्तर देणार आहोत. आयएईए वर देखील इराणनं आरोप केले. ही संस्था युद्ध भडकवणाऱ्यांची बाजू घेते, असं देखील इराणनं म्हटलं. अमेरिकेच्या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय संस्थांची शांतता भविष्यातील अभूतपूर्व संकटाला जन्म देईल. अमेरिकेनेच चर्चा सुरु असताना इराणसोबत युद्ध सुरु केलं आहे हे आंतरराष्ट्रीय संस्थांनी विसरु नये असं म्हटलं. संयुक्त राष्ट्रांनी आपातकालीन अधिवेशन बोलवावं, असं देखील इराणनं म्हटलं.


















