(Source: ECI | ABP NEWS)
गोपीनाथ मुंडेंची तिसरी लेक राजकीय मैदानात; अमेरिकेत शिक्षण घेतलेल्या यशश्री निवडणूक लढणार
राज्यातच नाही तर देशातल्या राजकारणात नावाजलेलं नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे, त्यांचा राजकीय वसा घेत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंंडेंनी राजकारणात स्वत:ला सिद्ध केलं

बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे (Pankaja munde) , प्रीतम मुंडे यांच्यानंतर मुंडे घराण्यातील तिसरी कन्या यशश्री मुंडे या देखील राजकारणात सक्रीय होत आहेत. यंदा बीडमधील (Beed) वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरल्या आहेत. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीनिमित्त यशश्री मुंडे यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला आहे. यानिमित्ताने यशश्री मुंडे या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. राजकारणापासून (Politics) गेल्या काही काळ दूर राहिलेल्या यशश्री मुंडे आता वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. वडिलांचा राजकीय वारसा जपत मुंडे घराण्याच्या तिन्ही मुली आपलं अस्तित्व निर्माण करुन दाखवत आहेत.
राज्यातच नाही तर देशातल्या राजकारणात नावाजलेलं नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे, त्यांचा राजकीय वसा घेत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंंडेंनी राजकारणात स्वत:ला सिद्ध केलं. त्यामध्ये पंकजा मुंडे दोन वेळा विधानसभेच्या आमदार राहिल्या आहेत, तर आता त्या विधान परिषदेवर आमदार असून राज्याच्या मंत्री आहेत. विशेष म्हणजे राज्याचे ग्रामविकासमंत्रीपदही त्यांनी भूषवली असून सध्या पर्यावरणमंत्री आहेत. तर, प्रीतम मुंडे या बीड जिल्ह्याच्या दोन वेळा खासदार राहिलेल्या आहेत. आता नुकत्याच वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीनिमित्त यशश्री मुंडे यांनी पहिल्यांदाच बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे. अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून प्रॉमिसिंग आशियाई स्टुडन्ट म्हणून गौरवही करण्यात आला. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघींचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. तर यशश्री यांनी शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे.आता वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जामुळे यशश्री मुंडे चर्चेत आल्या आहेत.
आधी या बँकेत स्वतः दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. यशश्री मुंडे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे याची जिल्ह्यात चर्चा होऊ लागली. विदेशातून वकिलीचे शिक्षण घेतलेल्या यशश्री मुंडेंनी आता बँकेच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केल्याने त्या संचालक झाल्यास बँकेलाही याचा मोठा फायदा होईल, असे राजकीय जाणकार सांगतात. तर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मुंडे परिवार एकत्र आला असून त्यानंतर आता बँकेच्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे यांनी आपला अर्ज दाखल केल्याने आता दोन्ही भगिनी आता संचालक मंडळात पाहायला भेटतील का हे लवकरच स्पष्ट होईल. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी बँकेला आपल्या तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. पुढे मुंडे भगिनींनी आजवर या बँकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आता यशश्री मुंडे यांनी बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलाय. मात्र, प्रीतम मुंडे यांच्या वैद्यनाथ बँकेमधील एन्ट्रीने मात्र जिल्ह्यातील राजकारण्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
17 जागांसाठी 10 ऑगस्टला मतदान
वैद्यनाथ बँकेच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यशस्वी मुंडे या भगिनींसह 71 अर्ज दाखल झाले. 29 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा
हायवेनंतर थेट मसनवाट्यातच सुरू; महिलेसोबत भाजप नेत्याचं कांड, लोकांना म्हणाला, तुमच्या पाया पडतो
























