Sanjay Shirsat on Sanjay Raut : मला बदनाम करण्यासाठी मॉर्फ व्हिडीओ वापरला, राऊतांविरोधात संजय शिरसाटांनी ठोकला शड्डू, म्हणाले, अब्रू नुकसानीचा दावा करणारच!
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय शिरसाट यांचा त्यांच्या बेडरूममधील पैशांनी भरलेल्या बॅगचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Sanjay Shirsat on Sanjay Raut : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या बेडरूममधील एक व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समोर आणला होता. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट यांच्या शेजारी रोख पैशांनी भरलेली एक बॅग दिसून येते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संजय शिरसाट यांनी त्या बॅगेमध्ये पैसे नसून कपडे होते, असे याआधी म्हटले आहे. यानंतर, आज शनिवारी (दि. 12) संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.
मला बदनाम करण्यासाठी मॉर्फ व्हिडीओ वापरला : संजय शिरसाट
संजय शिरसाट म्हणाले की, मला बदनाम करण्यासाठी हा मोर्फ व्हिडीओ वापरला. मी ठरवलंय की, अशा लोकांना धडा शिकवायला हवा. स्वप्ना पाटकरबाबत त्यांचे व्हिडीओ पाहा मग तुम्हाला कळेल ते कसे आहेत. माझा तो व्हीडिओ हे माझं चारित्र्यहनन आहे. मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर गुन्हा दाखल करेन, असा इशारा त्यांनी संजय राऊत यांनी दिला आहे.
...तर गुन्हा दाखल करणार : संजय शिरसाट
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, मी आज त्यांना नोटीस पाठवणार आहे. उत्तर दिलं नाही तर फौजदारी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करणार आहे. त्यांना मान नाही, त्यांची लायकी नाही, रोज सकाळी भोंगा सुरुच आहे. महाराष्ट्रात यांची गँग कार्यरत आहे. आता मलाही त्यांच्या सरकारी बंगल्यातील पार्ट्या काढाव्या लागतील. नालयकांनो कुठला तरी व्हिडीओ माझा काढला, तुम्हाला लाज लज्जा वाटते का? तुम्ही नीच पातळी गाठत आहात. हे सगळे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहेत, असा संताप देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध झाला, मी तो प्रसिद्ध करण्याआधी मीडियावर तो आला. त्यात या राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत बाजूला पैशाच्या उघड्या बॅगा आहेत, काही बॅगा उघड्या आहेत तर काही बॅगा बंद आहेत, काही बॅगा कपाटात आहेत असा तो व्हिडिओ आहे. जर तुम्ही जनसुरक्षा कायदा आणला आहे. मग जनहितासाठी हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असेल तर त्यात कुणाची बेअब्रू होण्याचे कारण नाही. व्हिडिओ मी चोरून काढलेला आहे का? मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, हा व्हिडिओ त्यांच्या घरातला आहे. ते कुठे राहतात हे मला माहित नाही. संजय शिरसाट हे अतिविशिष्ट व्यक्ती आहेत, ते महात्मा आहेत, ते संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे पुरावे जर कोणी समोर आणले असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. एक मंत्री आक्षेपार्ह अवस्थेत पैशांच्या बॅगांसह बसलेला आहे. सिगरेटचे झुरके मारत आहे. हे चित्र आमचे नाही, हे चित्र महाराष्ट्राची प्रतिमा आहे. या सरकारची प्रतिमा काय आहे? हे त्या व्हिडिओतून दिसत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आणखी वाचा




















