(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coastal Road : कोस्टल रोड-वरळी सेतू मार्ग जोडला जाणार, थेट वांद्रेपर्यंत जाता येणार
बई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या वरळी ते मरिन ड्राईव्हची एक मार्गिका सुरू झाली असताना आता कोस्टल रोडच्या मरीन ड्राईव्हकडून वरळी सागरी सेतूला जोडणा-या म्हणजे दोन सागरी सेतू जोडण्यासाठी महत्त्वाचे असलेले गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. दोन सागरी सेतू जोडण्यासाठी आवश्यक असलेला सुमारे 136 मीटर लांबीचा आणि 2 हजार मेट्रिक टनाचा महाकाय गर्डर रायगडच्या न्हावामधून सी लिंककडे आणण्याचे काम सुरू झाले आहे. दोन दिवसांत हा गर्डर पोहोचल्यानंतर तो जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. कोस्टल रोड-वरळी सागरी सेतूदरम्यान 46, 44 आणि 60 मीटरचे तीन गर्डर या आधी बसवण्यात आले आहेत. या कामात महत्वाचा टप्पा असलेल्या 136 मीटरच्या सर्वात मोठया बो स्ट्रिंग आर्च गर्डरची बांधणी रायगड जिह्यातील न्हावा येथे करण्यात आली आहे. रविवारी न्हावा जेट्टीवरून हा गर्डर बार्जमध्ये टाकून वरळीच्या दिशेने आणण्याचे काम सुरू झाले आहे. वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी पिलर 7 व पिलर 9 च्या मध्ये हा गर्डर बसवण्यात येणार आहे. हा गर्डर बसवणे कोस्टल रोड प्रकल्पातील सर्वाधिक आव्हानात्मक काम आहे. अरबी समुद्रात भरती व ओहोटीचा अंदाज घेऊन हा गर्डर बसवण्यात येणार आहे.