Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Assembly Elections 2024 : सरोज अहिरे यांच्याविरोधात शिंदेंनी राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म दिला होता. राजश्री अहिरराव नॉट रिचेबल असल्याने त्यांची उमेदवारी कायम आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Assembly Elections 2024) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांविरोधात हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले होते. महायुतीत राष्ट्रवादीच्या देवळालीच्या उमेदवार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांच्याविरोधात शिंदेंनी राजश्री अहिरराव (Rajashree Ahirrao) यांना एबी फॉर्म दिला होता. तर दिंडोरीचे उमेदवार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्याविरोधात शिंदेंनी धनराज महाले (Dhanraj Mahale) यांनी एबी फॉर्म दिला होता. धनराज महाले यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर राजश्री अहिरराव नॉट रीचेबल असल्याने त्यांची उमेदवारी कायम आहे. आता दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असणाऱ्या राजश्री अहिरराव यांनी एबीपी माझाशी बोलताना अजब दावा केलाय.
राजश्री आहेरराव यांना शिंदे गटाने हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवला होता. राजश्री अहिरराव गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होत्या. त्यामुळे अहिरराव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी माजी खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. पक्षाच्या सचिवांच्या सहीचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले. उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्याने उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी विनंती शिंदे गटाकडून करण्यात आली होती.
राजश्री अहिरराव यांचा अजब दावा
मात्र राजश्री अहिरराव उपस्थित नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला नाही. आता दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असणाऱ्या राजश्री अहिरराव यांनी एबीपी माझाशी बोलताना अजब दावा केलाय. सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी गेल्यानं शहरात काय घडले याबाबत माहिती नसल्याचे अहिरराव यांनी म्हटले आहे. त्यामुळे देवळाली विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडीची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला चार्टर्ड प्लॅनने एबी फार्म देण्यात आला, माघारीसाठी पक्षाकडून दबाव टाकण्यात आला. मात्र, उमेदवार नॉट रिचेबल असल्याने अहिरराव यांची उमेदवारी कायम आहे. आता देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे आणि राजश्री अहिरराव या दोन महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. आता देवळालीत अजित पवार गटाच्या सरोज अहिरे, शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव आणि ठाकरे गटाचे योगेश घोलप यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा