नागपूर : वसतीगृहात विद्यार्थ्याचं रॅगिंग, जबरदस्तीने विषारी द्रव्य पाजलं, कुटुंबियांचा आरोप
डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून मराठवाड्यातून नागपुरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विष्णू पवार नावाच्या विद्यार्थ्याने शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहात त्याच्यासोबत रॅगिंगचा अमानवी प्रकार घडल्याचा गंभीर आरोप केला आहे. वसतीगृहातील सिनिअर विद्यार्थ्यांनी विष्णूला अज्ञात विषारी द्रव्य पाजल्याचा आरोप पीडित पवार कुटुंबाने केला. सध्या अत्यवस्थ असलेल्या विष्णूवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उपराजधानीत आयुर्वेदिक डॉक्टर बनण्यासाठी आलेला विष्णू पवार सध्या स्वतः नागपूरच्या क्रिटी केयर रुग्णालयात उपचार घेत आहे. कारण, तो राहत असलेल्या शासकीय आदिवासी वसतीगृहात रॅगिंग करताना सिनिअर मुलांनी त्याच्यासोबत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. मात्र, 21 फेब्रुवारीच्या रात्री वसतीगृहातील काही सिनिअर विद्यार्थ्यांनी त्याला 205 क्रमांकाच्या खोलीत बोलावून जबर मारहाण केली, असा आरोप विष्णूने केला.