(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामधून घोषणांचा वर्षाव करण्यात आला आहे.
पुणे : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांसाठी ऐनवेळी भूमिका बदलली. आपण राज्यात एकही उमेदवार देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं असून काही ठिकाणी पाडापाडी करायची, अशा शब्दात मराठा समजाला आवाहन केलं आहे. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेचा नेमका कोणाला फायदा होईल, यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत. राजकीय वर्तुळातही जरांगेंच्या भूमिकेची चर्चा होत आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) पत्रकार परिषदेत बोलताना, मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे केले असते तर भाजपला फायदा झाला असता, असे म्हटले होते. आता, अजित पवारांनाही (Ajit pawar) याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल, असे म्हणत ते कसंही हेही अजित पवारांनी समजावून सांगितलं.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामधून घोषणांचा वर्षाव करण्यात आला आहे. याच अनुषंगाने पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, बारामतीचा मतदार माझा परिवार आहे. बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा आहे, तसेच सुप्रिया सुळे यांचा देखील मोठा वाटा असल्याचे अजित पवार म्हणाले. काल महायुतीच्या प्रचाराचा नारळ आम्ही फोडला आहे. आमचा युतीचा जाहीरनामा येणार आहे. पण पक्षाचा जाहीरनामा येत आहे. ज्या भागात आमचे उमेदवार आहेत, तिथं वेगळे जाहिरनामे असतील. महाराष्ट्रमधील सगळ्यात जास्त निधी बारामतीत आणल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीला पहिले सौरऊर्जा शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच कॅन्सर हॉस्पिटलही उभारणार आहे, लॉजेस्टिक पार्क उभारणार आहे. शिक्षण, दर्जेदार रस्ता, शेतीच्या विकासाचा वादा, सामाजिक विकासाचा वादा पूर्ण करणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले.
मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा
मनोज जरांगे यांनी सुरुवातीला सांगितले होतं की ते निवडणूक लढणार आहेत, परत त्यांनी तो निर्णय मागे घेतला आहे. आता, मनोज जरांगे यांनी सांगितलंय की, चांगल्या उमेदवाराला मत द्या. मग, आम्ही स्वत:ला चांगले समजतो, त्यामुळे मनोज जरांगे यांचा आम्हाला फायदा होईल अशी मिश्कील टिपण्णी अजित पवार यांनी केली आहे. तसेच, मला पक्षाने सांगितले इथे उभा राहा. माझ्या समोर कोणतरी उभं राहणार आहे. मी लढू शकत नाही का? जेव्हा निवडणुकीमध्ये उतरतो तेव्हा समोरचा उमेदवार स्ट्रॉंग आहे असं म्हणूनच लढत असतो. साहेबांनी कौतुक केलं की चांगलं वाटतं असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या अगोदर तुम्ही भाजपासोबत गेले असता तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असता?, या प्रश्नावर उत्तर देताना, आत्या बाईला मिशा असत्या तर काय झालं असते, ते असं आहे, मला त्यावर आता काही बोलायचं नाही. सध्या निवडणूक प्रचारात सर्वजण व्यस्त आहेत. त्यामुळे, आम्ही तिघे एका ठिकाणी दिसणार नाही, त्यातून वेगळ्या बातम्या चालवू नका, असे म्हणत अजित पवारांनी महायुती व आम्ही एकत्रच असल्याचे म्हटले.
मनोज जरांगेच्या भूमिकेबद्दल काय म्हणाले राज ठाकरे
मनोज जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाशी आमचा संबंध नाही. मात्र, त्यांनी उमेदवार उभे केले असते तर भाजपला फायदा झालं असता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भाने मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन राजकीय वादळ उठलं आहे. तर, मनोज जरांगेंचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सांगण्यावरुन घेतल्याची टीकाही केली जात आहे. त्याच अनुषंगाने शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. दरम्यान, मैत्रिपूर्ण लढतींवर आपला विश्वास नसल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.