(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
kolhapur uttar vidhan sabha Drama: मधुरिमाराजे यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावरुन चित्रा वाघ यांनी सतेज पाटील आणि शाहू महाराजांना लक्ष्य केले.
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात घडलेल्या राजकीय नाट्यावर भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी भाष्य केले आहे. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे (madhurima raje) यांनी ऐनवेळी माघार घेतली. मधुरिमाराजे या छत्रपतींची सून असूनही त्यांचा जाहीररित्या अपमान करण्यात आला, असे चित्रा वाघ यांनी म्हटले. यावरुन चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि खासदार शाहू महाराज यांना टोलाही लगावा. तुमच्या सोबत कोणी काय केलं तुमची कोणी घंटी वाजवली ते बंटी भाऊंनी शोधावे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
मी एक राजकीय कार्यकर्ता आहे हे विसरून जा. मी एक बाई आहे ना त्या वेळेला त्या ताईंच्या चेहऱ्यावरचे जे अगतिकतेचे भाव होते, ते बघून या राज्यातली प्रत्येक बाई आतून हलली असणार. त्या कोणी साध्यासुध्या नाहीयेत. छत्रपतींच्या सुनबाई आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की छत्रपतींच्या सुनबाई बरोबर कशा पद्धतीने वागण्यात आले. त्यांचा नवरा त्याने तिचा असा हात असा खेचून त्यांना पुढे घेतलं, त्यांचे सासरे जे तुतारीचे खासदार आहेत छत्रपती आहेत त्यांनी सांगितलं यांच्यासमोर सही करा. ज्या दरडावणीच्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलले, हे सगळ्यांनी पाहिले. त्या ताई आल्या त्यांनी सही केली नवऱ्याने त्यांना खेचून आणतानाचे त्यांचे चेहऱ्याचे भाव सासऱ्याने फर्मान सोडलं की, यांच्यासमोर सही करा त्या वेळेला त्यांचा चेहरा, त्या ते सबमिट करायला गेल्या तेव्हा त्यांची चाल तिथून त्या बाहेर येताना त्यांच्या चेहऱ्यावरती जी अगतिकता दिसत होती. ती डोळ्यात पाणी आणणारी होती, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
सर्वसामान्य घरातील बाईचाही नवरा अशाप्रकारे अपमान करत नसेल: चित्रा वाघ
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेता सतेज पाटील बंटी पाटील या बंटी पाटलांनी गादीचा मान असं म्हणत कॅम्पेनिंग 'मान कोणाला छत्रपतींच्या गादीला' आणि त्याच परिवारातल्या छत्रपती दम नव्हता तर उभे कशाला राहिलात, अशा पद्धतीची जी भाषा वापरली. तुमच्या सोबत कोणी काय केलं तुमची कोणी घंटी वाजवली ते बंटी भाऊंनी शोधावे. छत्रपतींच्या सुनबाईचा ज्या पद्धतीने त्यांच्या घरातल्यांनी पण आणि या बंटी पाटील ज्या पद्धतीने त्यांचा जे वागले, जो पाणउतारा केला तो मनाला त्रासदायक होता. आमच्या सगळ्यांसाठी वेदनादायी होता. सर्वसामान्य घरातली बाई पण म्हणत होती आमच्या नवऱ्याची पण अशी हिम्मत नाही आम्हाला असा हात धरून खेचून आणायची. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली गेली, ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागलं गेलं मी मगाशीच म्हटलं राजकीय कार्यकर्ता म्हणून सोडून द्या पण एक बाई म्हणून मला अतिशय वेदनादायी वाटलं. त्यांच्या चेहऱ्याची अगतिकता बघवत नव्हती त्या कुठल्या मनस्थितीत असतील तर त्यांना आणि परमेश्वरालाच माहिती परमेश्वराने त्यांना बळ द्यावं अशी मी प्रार्थना सुद्धा करता येईल, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.
यावेळी चित्रा वाघ यांनी महायुतीच्या उमेदवाराविषयी गौरवोद्गार काढले. आता अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि आमचे दक्षिण सोलापूर दक्षिणचे उमेदवार सुभाष बापू देशमुख हे फक्त राजकारणी नाहीत. ते समाजकारणी आहेत आणि त्यामुळे समाजकारणाच्या सोबतच म्हणजे आमदार म्हणून त्यांना जी काही कर्तव्य पार पाडायची असतात. त्याच्याशिवाय जे विविध सामाजिक उपक्रम मग इथल्या सगळ्या ज्यांना कोणीच नाही, आहे अशा आई-बाबांना डबा पोहोचवण्यापासून सामूहिक लग्नांपासून विविध समाज उपयोगी कार्यक्रम ते करत असतात. या सगळ्या त्यांच्या कामाची मी साक्षीदार आहे. मला आनंद आहे की ज्या वेळेला पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या प्रवेश झाला होता तेव्हा पहिला डायस राज्यातला जर कुणाचा असेल तर ते सुभाष बापू देशमुख यांचा होतं आणि रक्षाबंधनाच्या त्यांच्या त्या मंगलमय अशा कार्यक्रमाला त्यांनी मला बोलावलं आणि तिथून माझी सुरुवात झाल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
आणखी वाचा