Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापलं जाणार?
Pakistan's Name On Indian Team's Jersey : आशिया चषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापलं जाण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असण्याची ही पहिलीच वेळ असेल.
Pakistan's Name On Indian Team's Jersey : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) ही स्पर्धा पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका (Sri Lanka) या दोन देशात खेळवली जाणार आहे. या दोन्ही देशांकडे आशिया चषकाचं यजमानपद आहे. वृत्तानुसार, आशिया चषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर (Jersey) पाकिस्तानचं नाव छापलं जाण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असण्याची ही पहिलीच वेळ असेल. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील काही सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहे. या स्पर्धेचा मुख्य यजमान पाकिस्तान आहे. परंतु भारताने पाकिस्तानात सामने खेळण्यास नकार दिला आहे.
...म्हणून भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असू शकतं
त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेतील आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. पाकिस्तान हा आशिया चषकाचा मुख्य यजमान आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी संघांना आपल्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव लिहावं लागेल. त्यामुळेच भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव लिहिलं जाण्याची शक्यता आहे. भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव आशिया कपच्या लोगोच्या खाली असेल. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ 2 सप्टेंबरला आपला पहिला सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होणार आहे.
भारत-पाकिस्तानमधील सामना श्रीलंकेच्या कँडीमध्ये रंगणार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा महामुकाबला श्रीलंकेतील कँडीमध्ये खेळवला जाणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी स्टेडियम हाऊसफुल्ल होण्याची अपेक्षा आहे. ग्रुप स्टेज व्यतिरिक्त सुपर-4 मध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामनाही रंगण्याची शक्यता आहे. जर दोन्ही संघ सुपर-4 साठी पात्र ठरले तर दोघांमध्ये आणखी एक सामना पाहायला मिळेल. सुपर-4 व्यतिरिक्त अंतिम फेरीतही दोघांमध्ये टक्कर होऊ शकते. अशाप्रकारे आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकदाच नव्हे तर तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात.
आशिषा चषकाचा अंतिम सामनाही श्रीलंकेत!
दरम्यान 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पाकिस्तानातील मुल्तान इथे खेळवला जाणार आहे. यानंतर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना यजमान श्रीलंकेत होणार आहे. याशिवाय या स्पर्धेचा अंतिम सामनाही श्रीलंकेत होणार आहे. स्पर्धेतील बहुतंश सामने श्रीलंकेमध्येच खेळवले जाणार आहेत.
हेही वाचा