(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेन प्रकरणावर 7 आणि 8 मार्चला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार
रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या मुद्यावर 7 आणि 8 मार्चला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.
Russia-Ukraine War : सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशामध्ये युद्ध सुरु आहे. दिवसेंदिवस तेथील युद्धचा भडका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या मुद्यावर 7 आणि 8 मार्चला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यात त्यांनी रशियाने युद्धाच्या निमित्ताने निष्पाप नागरिकांचा नरसंहार केल्याचा आरोप आहे. तसेच युक्रेनमध्ये रशियाला लष्करी कारवाई आणि शिक्षा थांबवण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावेत अशी मागणी केली होती.
आंतरराष्ट्रीय न्यायालय हे संयुक्त राष्ट्रांचे एक प्रमुख न्यायिक अंग आहे. त्यामुळे आता या युद्धासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण करुन 6 दिवस उलटले आहेत. रशियन सैन्यांचा ताफा युक्रेनच्या राजधानीजवळ येत आहेत. या दोन देशातील जमिनीवरील लढाई अधिक तीव्र होत आहे. मंगळवारी, रशियाने युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खारकिव्हमध्ये गोळबार केला असून, त्याठिकाणी मृतांची संख्या वाढत आहे.
दरम्यान, या युद्धामुळे युक्रेनमधील परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. खारकिव्ह आणि राजधानी किव्ह यामध्ये लष्करी तळावर रशियन रणगाड्यांनी नुकताच हल्ला केला आहे. या हल्ल्यात 70 हून अधिक युक्रेनच्या सैनिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. युक्रेनच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्य युक्रेनमधील नागरी स्थळांना लक्ष्य करत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं जगाची चिंता वाढली आहे. अशातच रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं एका खासगी यूएस कंपनीचा हवाला देत वृत्त दिले आहे की, 40 मैल (सुमारे 64 किमी) लांबीचा रशियन लष्करी ताफा युक्रेनची राजधानी किव्हच्या दिशेनं जात आहे. सॅटेलाईट फोटोच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, खासगी यूएस कंपनीनं सांगितलंय की, सोमवारी घेतलेल्या सॅटेलाईट फोटोंमध्ये युक्रेनची राजधानी किव्हच्या उत्तरेला रशियन लष्करी ताफा दिसला, जो यापूर्वी दिसलेल्या 17 मैल (27 किमी) पेक्षा जास्त लांब आहे.
महत्त्वाच्या बातम्या: