(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ukraine Russia War : Apple चा मोठा निर्णय, रशियात उत्पादनांची विक्री रोखली
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर Apple ने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने रशियामध्ये सर्व उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सोबतच रशियाच्या अनेक अॅप्सना App Store मधून हटवलं आहे.
मुंबई : युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये सुरु असलेलं युद्ध संपुष्टात येईल अशी चिन्हं सध्यातरी दिसत नाही. दोन्ही देश दररोज एकमेकांवर हल्ला करत आहेत. जगातील बहुतांश देश रशियाच्या विरोधात उभे आहेत. त्यातच आता अमेरिकेतील मोठी टेक कंपनी अॅपलने मंगळवारी (1 मार्च) रशियामध्ये सर्व उत्पादनांची विक्री रोखली आहे. सोबतच युक्रेनमधील रशियाच्या सैन्य मोहिमेमुळे देशात Apple Payआणि इतर सेवा स्थगित केल्या आहेत. रशियामध्ये आता अॅपल अॅप स्टोअरमधून काहीही डाऊनलोड होऊ शकणार नाही.
अॅपलने परिपत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली. "आम्ही रशियामध्ये आमच्या सर्व चॅनलमध्ये उत्पादनांची निर्यात रोखली आहे. तिथल्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे."
अॅपलने काय म्हटलं?
अॅपलने परिपत्रकात म्हटलं की, "युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यामुळे आम्ही चिंताग्रस्त आहोत. हिंसा सहन करणाऱ्या सर्व लोकांच्या आम्ही सोबत आहोत. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल आम्ही अनेक पाऊलं उचलली आहेत. मागील आठवड्यात आम्ही सर्व सेल चॅनल्समधील निर्यात रोखली होती. अॅपल पे आणि इतर सेवाही स्थगित केल्या आहे.
RT News आणि Sputnik News आता रशियाबाहेर App Store स्टोअरवर उपलब्ध नाहीत. आम्ही Apple Maps चे ट्रॅफिक आणि लाईव्ह इन्सिडन्ट हे दोन्ही फीचर युक्रेनमध्ये बंद केले आहेत.
आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि संबंधित सरकारांसोबत बातचीत करत आहोत."
दरम्यान अॅपलने आपल्या परिपत्रकात अॅप स्टोअरबाबत फारशी माहिती दिलेली नाही. मात्र कंपीने युक्रेनमध्ये अॅपल मॅप्सचं ट्रॅफिक आणि लाईव्ह इन्सिडन्ट फीचर डिसेबल केलं आहे. अॅपल आधी गुगलनेही असं पाऊल उचललं आहे. गुगलनेही युक्रेनमध्ये गुगल मॅप्सचा ट्रॅफिक डेटा ऑफ केला आहे.
युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं अॅपलला आवाहन
मागील आठवड्यात युक्रेनचे उपपंतप्रधान Mykhailo Fedorov यांनी अॅपलला एक खुलं पत्र लिहून त्यांनी कंपनीची उत्पादनं, सेवा आणि अॅप स्टोअरपासून रशियाला दूर करण्याचं आवाहन केलं. होतं. याचा तरुणांवर परिणाम होईल आणि रशियाचे लोक त्यांच्या सैन्याच्या इराद्यांचा विरोध करतील, असं त्यांनी म्हटलं होतं.
अॅपलच्या निर्णयानंतर उपपंतप्रधानांनी ट्वीट करुन रशियामध्ये अॅपल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातल्याची माहिती दिली. त्यांनी अॅपल अॅप स्टोअरचा अॅक्सेस बंद करण्याचीही मागणी केली आहे.
No more @Apple product sales in Russia!
— Mykhailo Fedorov (@FedorovMykhailo) March 1, 2022
Now @tim_cook let's finish the job and block @AppStore access in Russia. They kill our children, now kill their access!