Thane News : खड्ड्यांमुळं ठाण्यात दुचाकीस्वराचा मृत्यू , यावर्षीच्या पावसाळ्यात गेलेला पहिला बळी
ठाण्यात खड्ड्यांमुळं एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळं गेलेला हा पहिला बळी आहे.
Thane News : ठाण्यात खड्ड्यांमुळं एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळं गेलेला हा पहिला बळी आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाला आहे. मागून येणाऱ्या महामंडळाच्या बसच्या मागच्या चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी बाईकवरुन प्रवास करत असताना चालकाचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला. त्यानंतर मागून आलेल्या बसच्या मागच्या चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याच ठिकाणी थोड्या वेळाच्या अंतराने आणखीन एक बाईक चालवणारा खड्ड्यामुळं पडला आहे.
दरवर्षी रस्त्यावरील खड्ड्यामुळं अनेक दुचाकीस्वरांचे मृत्यू होतात. यावर्षी देखील तेच अपघात पुन्हा सुरु झाल्याचं चित्र दिसत आहे. ठाण्यात खड्ड्यांमुळं एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात रस्त्यांची दुरावस्था समोर आली आहे. ठाण्यात कोपरी पुलावर वर्षभर खड्डे आणि वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळं मुख्यमंत्री ठाणेकरांची या रस्त्यांचया दुरावस्थेतून कधी सुटका करणार असा प्रश्न विचारला जात आहे. कोपरी ब्रीजचे उद्घाटन होऊन एक वर्षही झालं नाही, तरी त्याची मोठी दुरावस्था झाली आहे.
राज्यात राजकारण्यांचं सगळं ओक्केमध्ये सुरु असताना, जनता मात्र नॉट ओक्के असंच आता या लोकप्रतिनिधींना सुनावणार आहे. कारण राज्यात अनेक ठिकाणी पहिल्या पावसात रस्त्यांची चाळण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाणे शहरही याला अपवाद नाही. ठाणे शहरात नागरिक आज खड्डे आणि वाहतूक कोंडीनं हैराण झाले आहेत. कोपरी पुलावर अवघ्या वर्षभरात खड्डे पडल्यानं वाहतूक कोंडी झाली. मुंबईकडे जाणारी एकच लेन सुरु असल्यानं वाहतूक कोंडीचा त्रास ठाणेकरांना सोसावा लागतोय. वर्षभरात खड्डे पडल्यानं पुलाच्या निकृष्ट कामाकडेही लक्ष वेधलं जात आहे. ठाण्याच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाल्यानं ठाणेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजवून ठाणेकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशी त्यांची अपेक्षा आहे.