Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Vijay Wadettiwar on Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केलाय.
Vijay Wadettiwar on Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप केला जात आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरून विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खळबळजनक दावा केलाय.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटरही केला जाऊ शकतो. त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटर करू नका. मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्यासाठी असे होऊ शकते, अशी माहिती मला विश्वसनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. यावरून काहीही होऊ शकते, अशी या प्रकरणात शक्यता व्यक्त होत असल्याचे त्यांनी म्हटले.
...तर पोलीस विभागाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही
वाल्मिक कराडने सरेंडर केले, पोलीस त्याला पकडू शकले नाहीत, त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, बीडमधील यापूर्वीचा इतिहास असा आहे की, कराडलाच बॉस आणि बाप मानून त्या ठिकाणी पोलीस वागत होते. 22 दिवस पोलीस त्याला पकडू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे. त्यांना कदाचित ही माहिती नसेल. पण जनतेत चर्चा आहे. त्याकडे लक्ष दिले नाही तर पोलीस विभागाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
सीआयडीने वाईट काम केले म्हणून एसआयटी नेमली का?
एसआयटीचे पथक आज बीडमध्ये दाखल होणार आहे. याबाबत विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, सीआयडीचा तपास सुरू होता. आता एसआयटी आणली. हा तपास भरकटवण्यासाठी तर नसेल ना? अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली. एसआयटी म्हणजे राज्याबाहेरील पोलीस नाहीत. राज्यातीलच अधिकारीच आहेत. सीआयडीने वाईट काम केले म्हणून यांना नेमले का? असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
राजन साळवींची लढण्याची प्रवृत्ती कमी झाली असावी
राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता काही लोकांना सत्ता फार जवळची वाटते. सत्येशिवाय ते जगू शकत नाही. ते सत्तेसाठी जन्माला आलेले असतात. लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की माणूस सत्तेच्या मार्गाने जातो. राजन साळवींची लढण्याची प्रवृत्ती कमी झाली असावी त्यामुळे ते पळापळ करत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
आणखी वाचा