Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराड कस्टडीत असलेल्या बीड पोलीस ठाण्यात संतोष देशमुखांचा भाऊ पोहोचला, बाहेर पडताच म्हणाला...
Santosh Deshmukh Case: बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडला कोठडीत ठेवण्यात आल्यामुळे याठिकाणी सध्या विशेष सुरक्षा आहे. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुखांच्या हत्येचा ठपका
बीड: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणात दररोज नवी माहिती समोर येताना दिसत आहे. संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे तीन मारेकरी अद्याप फरार आहेत. तर या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराडने (Walmik Karad) पोलिसांसमोर शरणागती पत्कारली आहे. सध्या बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याची सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. बुधवारी बीड शहर पोलीस (Beed Police) ठाण्यातील एका बंद खोलीत वाल्मिक कराड याची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, त्यानंतर आणखी एका घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे बुधवारी अचानक वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेल्या बीड शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. ते काहीवेळ पोलीस ठाण्यात थांबले, अधिकाऱ्यांशी बोलले आणि त्यानंतर बाहेर पडले. बीड शहर पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला.
धनंजय देशमुखांना अचानक पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले की ते स्वत:हून याठिकाणी आले होते, याबाबत चर्चा रंगली होती. मात्र,
धनंजय देशमुख यांनी आपण तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात आल्याचे सांगितले. मी स्वतःहून सीआयडी कार्यालयात आलो होतो. मी दोन दिवसांपूर्वीही आलो होतो. तपास कुठपर्यंत आला आहे याबाबतची माहिती मी सीआयडी अधिकाऱ्यांना भेटून घेतली. माझ्याकडून काही सहकार्य अपेक्षित आहे का, मी काही मदत करु शकतो का, असे मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना विचारले. तपास चांगल्या पद्धतीने सुरु आहे. माझं तपास अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. एसआयटीची स्थापना झाल्याचे समजले. एसआयटीत कुठले अधिकारी आहेत याची माहिती घेऊ, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.
बीड शहर पोलीस ठाण्यात येणाऱ्यांची नोंद
बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांना कोठडीत ठेवण्यात आल्यामुळे याठिकाणी पोलिसांकडून विशेष खबरदारी बाळगली जात आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव आणि येण्याचे कारण नोंदवून घेतले जात आहे. हा डेटा दररोज सीआयडी आणि पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात येणार आहे. वाल्मिक कराडच्या चौकशीतून सीआयडीच्या हाती कोणती माहिती लागणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
आणखी वाचा