Madha Loksabha : माढ्यात मोहिते पाटलांची ताकद वाढणार, संजयमामांशी दोन हात करण्यासाठी नारायण पाटील तुतारी हाती घेणार
Madha Loksabha : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलाय. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकलाय.
Madha Loksabha : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलाय. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकत लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. लोकसभा लढवण्याचा निर्णय घेताच मोहिते पाटलांची ताकद वाढण्यास सुरुवात झाली आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. नारायण पाटील यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याने करमाळा तालुक्यातून मोहिते पाटलांना बळ मिळू शकतं.
काय म्हणाले नारायण पाटील?
मी गेली 10 वर्षे मोहिते पाटील यांच्यासोबत आहे. यावेळी लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत राहणार आहे, नारायण पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना करमाळ्यात मोठा धक्का बसलाय. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असणारे नारायण पाटील 26 एप्रिल रोजी करमाळा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्या गटाचे सर्व जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य तुतारी हाती घेणार असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले. करमाळ्यात संजय शिंदे अपक्ष आमदार असले तरी त्यांची अजित पवारांशी जवळीक आहे. शिवाय त्यांचे बंधू माढाचे आमदार संजय शिंदे हे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे नारायण पाटील यांना शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी स्पेस मिळालाय.
संजयमामा आणि बबनदादांकडून भाजपला बळ
अपक्ष आमदार संजय शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संजय शिंदे विरोधात असताना नारायण पाटील सोबत येणार आहेत, त्यामुळे मोहिते पाटलांना करमाळ्यातून बळ मिळणार असल्याचे चित्र आहे.
भाजपकडून उत्तम जानकरांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु
मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने नवी खेळी केली आहे. भाजपने मोहिते पाटलांचे विरोधक उत्तम जानकर यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. शिवाय, जयसिंह मोहिते पाटील यांच्याकडूनही उत्तम जानकरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे. उत्तम जानकर सोबत आले तर माळशीरसमधून लाखापेक्षा जास्त लीड मिळेल, असं जयसिंह मोहिते पाटलांनी म्हटलं होतं. त्यामुळेच सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुते उत्तम जानकरांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या