Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ हे शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला दाखल झाले आहेत. नाराजीनाट्यानंतर छगन भुजबळ आणि अजित पवार हे पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.

Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज असल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे भुजबळांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे भुजबळांची गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत जवळीक वाढत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन वेगळा निर्णय घेणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आता छगन भुजबळ हे शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला दाखल झाले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांची दूर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. काही दिवसांपासून भाजपचे महाअधिवेशन शिर्डीत पार पडले होते. या पाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिवेशन शिर्डीत होत आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे राज्यभरातील प्रमुख नेते शिर्डीत दाखल झाले आहेत. स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत या अधिवेशनात विचारमंथन केले जाणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत ठिकठिकाणी बॅनर आणि पक्षाचे झेंडे पाहायला मिळत आहेत. तर बॅनरवर छगन भुजबळ यांचे फोटो देखील लावण्यात आले आहे.
छगन भुजबळ अधिवेशनाला पोहोचले
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी छगन भुजबळ यांच्याबाबत भाष्य केले होते. पक्ष स्थापनेपासून छगन भुजबळ पक्षासोबत आहे. त्यांना अधिवेशनाचं निमंत्रण दिलं आहे. ते सुद्धा या अधिवेशनस्थळी उपस्थित राहतील, असे तटकरे यांनी म्हटले होते. तसेच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील छगन भुजबळ यांना अधिवेशनाला उपस्थित राहण्याच्या विनंती केली होती. तटकरे आणि पटेल यांच्या विनंतीनंतर छगन भुजबळ या अधिवेशनाला हजेरी लावणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आज सकाळी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे अधिवेशनस्थळी आल्याने छगन भुजबळ देखील अधिवेशनातील येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता छगन भुजबळ हे शिर्डीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनात नाराजीनाट्यानंतर छगन भुजबळ आणि अजित पवार हे पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहे. या अधिवेशनातून छगन भुजबळ काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
