Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
Nashik Civil Hospital : नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला मुलगा झाल्याची नोंद करीत प्रत्यक्षात नातेवाइकांच्या ताब्यात मुलगी दिलायचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
नाशिक : नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik Civil Hospital) प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला मुलगा झाल्याची नोंद करीत प्रत्यक्षात नातेवाइकांच्या ताब्यात मुलगी दिली. यामुळे नातेवाईक संतप्त झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. आता या प्रकरणी नाशिक जिल्हा रुग्णालयातील 8 जणांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदूर नाका येथील रहिवासी रुतिका पवार हिने रविवारी रात्री एका मुलास जन्म दिला. बाळाचे वजन कमी असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बाळाच्या पोटात पाणी असल्याचे उपचार करताना लक्षात आले. त्यामुळे त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचे तेथील डॉक्टरांनी सुचविले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पालकांनी डिस्चार्ज घेतला. त्याचे डायपर बदलत असताना हा सर्व झालेला प्रकार लक्षात आला.
परिचारिकेने दिशाभूल केल्याचा नातेवाइकांचा आरोप
मुलगा असल्याचे सांगून तेथील परिचारिकेने दिशाभूल केली असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला; मात्र डिस्चार्ज पेपर मुलगा असल्याचीच नोंद होती. या घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयातील वरिष्ठांना याबाबत विचारणा केली. ते जिल्हा शल्यचिकित्सक शिंदे यांनाही भेटले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते अनिल भडांगे यांनी जिल्हा रुणालय प्रशासनाला धारेवर धरले.
दोषी आढळल्यास कारवाई
नातेवाइकांनी मुलगा असल्याचा आरोप करत मुलगी देण्यात आल्याचा आरोप केला आहे. यामुळे कमिटी नेमण्यात आली असून, चौकशी सुरू आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर काय आहे ते स्पष्ट होईल. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. प्रत्यक्षात मुलगी होती अस परिचारिकांचं म्हणणं आहे. दुसरं बाळ त्या दिवशी नव्हतं. त्यामुळे जे काही आहे ते चौकशीमधून स्पष्ट होईल. यात जे कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे यांनी दिला होता.
8 जणांवर कारवाई
या प्रकारानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून समिती नेमण्यात आली होती. समितीकडून प्राप्त अहवालानुसार आठ जण दोषी आढळले आहेत. कामात हलगर्जीपणा दाखविल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयातील 8 जणांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. चार मुख्य डॉक्टर, तीन शिकाऊ डॉक्टर आणि एक परिचारिका यांच्यावर कारवाई होणार आहे.
टॅगने केला घोळ
तर जन्माला मुलगीच आली होती पण टॅगसह केसपेपरवर बाळाचा उल्लेख मुलगा असा केला गेला. बाळाला लावण्यात येणाऱ्या टॅगसह रजिस्टरमध्ये एफ ऐवजी एम असं लिहिल्यानं हा घोळ झाल्याचं जिल्हा शल्यचिकित्सकांनी म्हटलं आहे. पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी बाळाची डीएनए चाचणी केली जाईल. पण पालकांना विश्वास वाटल्यानं त्यांनी बाळाचा स्वीकार केला असल्याचंही जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले आहेत.
आणखी वाचा