Nashik Manikrao Kokate : शेतकरी, रस्ता, पाणी हे विषय नाहीत का? नाशिकच्या आमदारानं धरली घरची वाट
Nashik Manikrao Kokate : अधिवेशनात इतर विषय नाहीत का? असा संतप्त सवाल नाशिकच्या आमदाराने केला आहे.
Nashik Manikrao Kokate : गेला आठवडाभरापासून नागपूरमध्ये (Nagpur) हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. मात्र अधिवेशनात कोणाचा मृत्यू कसा झाला? महापुरुषांचे अपमान, राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप हेच विषय सुरु आहेत. राज्यातील इतर विषय संपलेत का? असा सवाल करत नाशिकचे आमदार माणिकराव कोकाटे (ManikRao Kokate) यांनी अधिवेशनावर रोष व्यक्त करत घरची वाट धरली आहे.
एकीकडे कोरोनामुळे (Corona) राज्यातील अधिवेशन झाले नाही. त्यात काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. त्याचब बरोबर कोरोनाचे सावट कमी झाल्याने नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गेल्या आठ दिवसांपासून हे अधिवेशन सुरु असून या आठ दिवसात विरोधी अपक्ष आणि सरकार यांच्यामध्ये कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरण त्याचबरोबर इतर नेत्यांची प्रकरणे उकरून त्यावर चर्चा झोडली जात आहे. त्यामुळे शेतकरी, पीकविमा, राज्यातील रस्ते, पाणी इतर विषय मागेच पडले असल्याचे दिसून येत आहे. आणि याच अधिवेशनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आठ दिवस अनुभव घेत नाशिकमध्ये परतले आहेत.
माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार असून ते गेल्या आठ दिवसांपासून अधिवेशनाला नागपूरला गेले होते. मात्र सध्या अधिवेशन सुरू असताना माणिकराव कोकाटे नशिकमध्ये असल्याचे समोर आले. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिवेशनाच्या कामकाजा बाबत नाराजी व्यक्त केली. अधिवेशनात शेतकरी नुकसान भरपाई, पीकविमा, वीजबिल, रस्ता, पाणी समस्या तसेच मतदारसंघातील विषयावर चर्चाच होत नसेल तर तिथे थांबून काय उपयोग अशी उद्विग्न प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली आहे. त्यामुळे पहिला आठवडा अधिवेशनात घालविल्यानंतर आमदार कोकाटे यांनी नाशिकची वाट धरली आहे.
ते म्हणाले नागपूर अधिवेशनात सध्या कोणाचा मृत्यू कसा, महापुरुषांचे अपमान यावर चर्चा होत आहे. मग राज्यातील सर्व विषय संपले का? त्यामुळे अशा विषयांवर चर्चा केली जातेय, असा सवाल कोकाटे आईनी उपस्थित केला आहे. आम्ही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो, मात्र कोणी ऐकून घ्यायला तयार नाही, दुसरीकडे विरोधी पक्षाची गळचेपी केली जाते आहे. मात्र मुख्य मुद्यांना बगल देण्यासाठी वेगळ्या विषयांवर चर्चा केली जात असल्याचे ते म्हणाले. एकूणच अधिवेशनात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोप व कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याने सभागृहात थांबणे अवघड झाले, म्हणूनच आम्ही घरची वाट धरल्याचे कोकाटे म्हणाले.