(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saptshrungi Gad : सप्तश्रुंगी गडावर मध्यरात्री दरड कोसळली, नांदुरी घाटाला डागडुजी गरजेची
Saptshrungi Gad : नाशिकच्या (Nashik) सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) जाणाऱ्या नांदुरी घाटात (Nanduri Ghat) दरड कोसळल्याची घटना घडली.
Saptshrungi Gad : नाशिकच्या (Nashik) सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) जाणाऱ्या नांदुरी घाटात (Nanduri Ghat) दरड कोसळल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक देवी ट्रस्ट कर्मचाऱ्यांच्या मदतीने घाट रस्त्यावरील दरड बाजूला करण्यात येऊन मार्ग सुरळीत करण्यात आला आहे. मागील काही वर्षांत गडावर येणाऱ्यांची संख्या वाढली असून या पार्श्वभूमीवर नांदुरी घाटाचे नूतनीकरण आवश्यक असल्याचे दिसून येते.
राज्यभरात परतीच्या पावसाने (Rain) थैमान घातले असून पुन्हा एकदा नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक भागात शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील चार महिन्यात असा पाऊस झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नाशिकमध्ये देखील गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने कहर केला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तश्रुंगी गडावर जाणाऱ्या नांदुरी घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने तुरळक वाहतूक होती. त्यामुळे वाहतूक कोंडी नाही. सकाळपर्यंत दरड हटविण्याचे पूर्ण झाल्याने वाहतूक सुरळीत झाली होती.
गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पावसामुळे आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या नांदुरी घाटात दरड कोसळली. ही दुर्घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने वाहने ये जा करत नव्हती. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र घाटात दरड कोसळल्याने मलबा रस्त्यावर पसरला होता. दरड कोसळण्याची माहिती मिळताच स्थानिक सप्तशृंगी देवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर कोसळलेल्या दरडीचा भाग हटवण्याचे काम सुरु केले. सकाळपर्यंत जेसीबी व कमर्चाऱ्यांच्या मदतीने दरड हटविण्यात आली. त्यानंतर वाहतुकीला मार्ग मोकळा झाला.
नांदुरी घाटात दरड कोसळल्यानंतर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांनी पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, संदीप बेनके ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक प्रमुख जॉन भालेकर, पराग कुलकर्णी, रुपेश गवळी, रवींद पवार, नितीन गुजर हे पथक उपस्थित झाले. त्यांनी तातडीने संबंधित जागेवरील दरड हटविण्याचे काम हाती घेत जेसीबीच्या साहाय्याने दगड बाजूला करत घाटातील मार्ग मोकळा केला.
घाट बनला धोकादायक
दरम्यान, सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी एक मार्ग असून हा मार्ग नांदुरी घाट म्हणून ओळखला जातो. मात्र हा घाट रस्ता गेली अनेक वर्षांपासून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी खड्डे पडले असून रस्ता अरुंद असल्याने अनेकदा वाहकांधारकांना मोठी कसरत करावी लागते. नवरात्रीच्या वेळी तर लांबच लांबच रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. दर दोन ते तीन महिन्यांनी घाटात दरड कोसळत असल्याने अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे नांदुरी घाटाचे नूतनीकरण होणे आवश्यक बनले आहे.