बोरिवलीत वृद्ध दाम्पत्याचा मानसिक छळ, मारहाण करणाऱ्या मुलगा आणि सुनेला अटक
चमेली आणि ब्रिजेश यांनी आपला मुलगा आणि सुनेविरोधात मारहाण करुन मानसिक छळ केल्याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली.
मुंबई : बोरिलवलीत वृद्ध आई-वडिलांना मारहाण करुन त्यांचे राहते घर बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला त्याच्या पत्नीसह पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोघांचीही एक जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आपला मानसिक छळ करत मारहाण करुन नाहक त्रास दिल्याची तक्रार या आई-वडिलांनी दिली होती.
चमेली सुरी आणि ब्रिजेश सुरी अशी वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. सुरी दाम्पत्य बोरिवलीतील भगवान दिन कुर्मी चाळीत गेल्या 50 वर्षांपासून राहत आहेत. त्यांना दोन मुले आणि तीन मुली आहेत. सर्व जण बोरिवलीतच राहतात. मात्र चमेरी सुरी आणि ब्रिजेश सुरी यांच्या लहान मुलगा प्रदीप सुरीचा आई-वडिलांच्या घरावर डोळा होता. या घरासाठीच त्याने आई-वडिलांचा छळ सुरु केला.
चाळीतील हे घर दोन्ही मुलांच्या नावावर करुन देण्यासंदर्भात चमेली आणि ब्रिजेश यांचं बोलणंही झालं होतं. तसा करार ही झाला आहे, मात्र प्रदीप आणि त्याची पत्नी चांदणी यांनी याच खोलीवर दुसरी खोली बांधून त्या ठिकाणी राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर घरात भांडणे सुरु झाली आणि या घराचा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला.
चमेली आणि ब्रिजेश यांनी आपला मुलगा आणि सुनेविरोधात मारहाण करुन मानसिक छळ केल्याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली. या त्रासाला कंटाळून ब्रिजेश सोनी गेली तीन वर्ष बोरिवली रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर राहत होते, तर चमेली सोनी याच चाळीत असणाऱ्या एका मंदिरात दिवसभर राहत होत्या. मात्र अखेर कंटाळून त्यांनी न्याय मिळावा यासाठी न्यायालयात केस दाखल केली.
तक्रारदारांचे वय 70 पेक्षा अधिक असल्याने न्यायालयानेही तत्परता दाखवत प्रकरण त्वरित तडीस नेलं. तहसीलदार, जिल्हाधिकारी, स्थानिक पोलिस प्रशासनाला यापूर्वी त्यांना त्रास देणाऱ्याचा बंदोबस्त करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 18 जून रोजी सोनी दाम्पत्याच्या बाजूने निकाल देत न्यायालयाने प्रदीप आणि चांदणीला अटक करण्याच्या सूचना कस्तुरबा मार्ग पोलिसांना दिल्या. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी प्रदीप आणि चांदणी यांना अटक केली. या दोघांना आता एक जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.