(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत LGBT परेडमध्ये शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा, 51 जणांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे
मुंबईत LGBT प्राईड परेडदरम्यान देशद्रोहाचा आरोपी शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी उर्वशी चुडावालासह 51 जणांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. शरजीलचं स्वप्न आम्ही पूर्ण करु अशी घोषणाबाजी करण्यात आली होती.
मुंबई : मुंबईत शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या LGBT प्राईड परेडदरम्यान देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी घोषणाबाजी करणाऱ्या उर्वशी चुडावाला आणि आणखी 50 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस आता उर्वशी चुडावालाचा शोध घेत आहेत.
या परेडदरम्यान उर्वशी चुडावाला नावाच्या मुलीने देशद्रोहाचा आरोप असलेल्या शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि शरजीलचं स्वप्न आम्ही पूर्ण करु असं म्हटलं होतं. शरजील देखील जेएनयूचा विद्यार्थी आहे. त्याने देशाचे तुकडे करण्यासंदर्भातील भाषण केलं होतं. देशातील विविध राज्यांमध्ये शरजील विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या शरजील दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरु आहे.
उर्वशी चुडावालाने घोषणाबाजी करताना म्हटलं की, "शरजील तेरे सपनों को, हम मंजिल तक पहुचाएंगे". याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी उर्वशीसह एकूण 51 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, आझाद मैदानातील घोषणाबाजी आपत्तीजनक आहे. त्याबाबतची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी उर्वशी फरार आहे. उर्वशी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची विद्यार्थिनी आहे. मुंबई झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधातील मोर्चांमध्येही उर्वशी सहभागी झाली होती.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईत LGBT परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात या परेडचं आयोजन करण्यात येणार होतं. मात्र मुंबई पोलिसांनी यंदा LGBT प्राईड परेडसाठी ऑगस्ट क्रांती मैदानाऐवजी आझाद मैदानात परवानगी दिली होती. या परेडमध्ये शेकडो, समलैंगिक, ट्रान्सजेंडर लोक सहभागी झाले होते.
What is this going on in Mumbai? And why is the Maharashtra Government tolerating this ? pic.twitter.com/1uqnKxs2ns
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 3, 2020
या घोषणाबाजीचा व्हिडिओ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला आणि म्हटलं की मुंबईत हे काय होत आहे? राज्य सरकार हे सहन का करत आहे? याआधी मुंबईत महक मिर्झा नावाच्या मुलीनेही गेट वे ऑफ इंडियावर आंदोलनादरम्यान फ्री काश्मीरचे पोस्टर दाखवले होते. तिच्याविरोधातही मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. यावर स्पष्टीकरण देताना सरकारने म्हटलं होतं की, याबाबतची पडताळणी करुन याप्रकरणी योग्य पावलं उचलली जातील.
VIDEO | मुंबईत LGBT परेडमध्ये शरजील समर्थक घोषणा? सोमय्यांकडून तक्रार दाखल