अंजली दमानियांचा संशय ठरतोय खरा, कळंबमधील महिलेची गाडी कोणाच्या नावावर? पोलीस तपासात समोर
महिलेकडे असलेली गाडी मनोज बियाणी यांच्या नावाने रजिस्टर असल्याने तिच्या हत्येचे गूढ आणखी वाढलं आहे.

धाराशिव : कळंब हत्या प्रकरणातील मृत महिला मनीषा बिडवे हिच्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सांगितलेली माहिती खरी ठरत असल्याचं दिसून येत आहे. संबंधित महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात वापर केला जाणारा असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. सोबतच ती महिला पाच नावाने वावरत असल्याचंही दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटल होते. दमानिया यांच्या पोस्टमुळे चर्चेत आलेल्या खून प्रकरणात मृत मनीषा बिडवे वापरत असलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ही गाडी मनोज बियाणी यांच्या नावाने रजिस्टर आहे. दमानिया यांच्या दव्यामध्ये मयत महिला मनीषा मनोज बियाणी नावाने वावरत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्यावर चारित्र्याहनन करण्याचा डाव आखण्यात येत होता, त्यामध्ये हीच महिला होती असा संशय बळावत आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
महिलेकडे असलेली गाडी मनोज बियाणी यांच्या नावाने रजिस्टर असल्याने तिच्या हत्येचे गूढ आणखी वाढलं आहे. महिला वापरत असलेली गाडी या प्रकरणातील आरोपी रामेश्वर भोसले हा चालवत होता. ज्यावेळी या महिलेचा खून करण्यात आला, त्यावेळी रामेश्वर भोसले याच गाडीच्या बोनेटवरती घराची आणि गाडीची चावी ठेवून गायब झाला होता. त्यामुळे, आता संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी महिलेचा काही धागेदोरे आहेत का, याची तपास पोलिसांकडून सुरू आहे.
कळंबमध्ये झालेल्या महिलेच्या हत्या या प्रकरणातील मुख्य साक्षीदार महादेव घुले यांच्यासोबत एबीपी माझाने संवाद साधला होता. ती महिला आपल्याला छळत असल्याची माहिती आरोपी रामेश्वर भोसलेने दिल्याचे महादेव घुलेने सांगितलं. कळंबमधील मनीषा बिडवेची तिचा ड्रायवर रामेश्वर भोसलेकडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात उस्मान गुलाब सय्यद असं दुसऱ्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान, मनीषाची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याची माहिती पोलिसाच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मात्र, पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
Manisha Bidve Murder Case : मनीषा बिडवेच्या हत्येचा थरार
संतोष देशमुखांचे मनीषा बिडवेशी अनैतिक संबंध दाखवण्याचा डाव होता.
याच मनिषा बिडवेची 22 मार्च रोजी हत्या, तर 29 मार्चला हत्या उघडकीस आली.
मनीषा बिडवे छळत असल्यानं हत्या केल्याचा रामेश्वर भोसलेचा दावा.
मनिषाची हत्या करुन रामेश्वर दोन दिवस त्याच घरात वास्तव्याला होता.
दोन दिवस मनिषाच्या मृतदेहाच्या शेजारी बसूनच रामेश्वरचे जेवण.
तीन दिवसांनंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर रामेश्वर फरार.
फरार होण्यासाठी रामेश्वरनं वापरली महिलेचीच गाडी.
हत्येनंतर रामेश्वरनं केजच्या मित्राला कळंबला नेऊन मृतदेह दाखवला.
हत्येच्या दिवशी मनिषाने उठाबशाही काढायला लावल्याचा रामेश्वरचा दावा.























