Maharashtra Weather Update : वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचं संकट! मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारपिटीची शक्यता, अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather Update : कोकण परिसरात देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बरसण्याची शक्यता आहे. राज्यात काही भागांत 'यलो तसेच ऑरेंज' अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. हा अवकाळी पाऊस उद्यापर्यंत म्हणजेच 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट जास्त असून, या भागात काही ठिकाणी 'गारपीट' होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, कोकण परिसरात देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बरसण्याची शक्यता आहे. राज्यात काही भागांत 'यलो तसेच ऑरेंज' अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन भागात हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे, तर पश्चिम बंगालपासून मध्य प्रदेशपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झालेली आहे. दक्षिण-पूर्व मध्य प्रदेशाच्या काही भागांत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. याबरोबरच लक्षद्वीप ते कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या सर्व स्थितीमुळे कोकणासह राज्याच्या सर्वच भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट यासह काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हा पाऊस 4 एप्रिलपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा केळी, द्राक्ष, कांदा पपई, गहू, मका, आदी पिकांना फटका बसला.
कोणत्या जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
यलो अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, सातारा, सातारा (घाट), सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
ऑरेंज अलर्ट : अहिल्यानगर, पुणे घाट, कोल्हापूर घाट, चंद्रपूर.
तळकोकणात पहाटे जोरदार अवकाळी पावसाची हजेरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. रात्री सह्याद्रीच्या पट्ट्यात वैभववाडी खोऱ्यात जोरदार पावसाने बॅटिंग केली. तर आज पहाटेपासून कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या लखलखाट आणि कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. उखाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू तसेच कोकम पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून यलो अलर्ट जारी केला आहे. 30 ते 40 किमी प्रति ताशी वेगाचा सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.























