एक्स्प्लोर
दिवा स्टेशनवर टोळक्याची प्रवाशाला मारहाण
दिवा स्थानक हे अलीकडच्या काळात झपाट्यानं गर्दी वाढत चाललेलं स्थानक म्हणून समोर येतंय. मात्र या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी लोकल अपुऱ्या पडू लागल्या आहेत.
दिवा (ठाणे) : मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वेस्थानकात दरवाजा अडवून उभं राहिलेल्या टोळक्यानं प्रवाशाला मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत विनायक चव्हाण हे प्रवासी जखमी झालेत. मात्र यानंतरही रेल्वे पोलीस या प्रकारांना गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत.
रेल्वे प्रवाशांची मुजोरी आता कुठल्या थराला गेलीय, याचं उदाहरण मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात समोर आलंय. लोकलच्या दरवाज्यात उभं राहून दरवाजा अडवणं, इतर प्रवाशांना आत येऊ न देणं हे प्रकार वारंवार होत असूनही रेल्वे पोलीस मात्र दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता प्रवाशांना मारहाण करण्यापर्यंत टवाळखोरांची मजल गेलीय.
दिव्यात राहणारे विनायक चव्हाण हे दररोज मुलुंड इथे कामाला जातात. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी दिव्याहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्थानक गाठलं. मात्र सकाळीच रेल्वेची रडगाणी सुरू असल्यानं रेल्वेसेवा २० मिनिटं उशिरानं सुरू होती. ८ वाजून ३९ मिनिटांची सीएसएमटीला जाणारी स्लो लोकल आल्यावर चव्हाण यांनी डब्यात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र नेहमीप्रमाणे कल्याणहून गर्दीने भरून आलेली लोकल आणि दार अडवून उभं असलेलं टोळकं यामुळे त्यांना डब्यात चढताच आलं नाही. त्यामुळे त्यांनी टोळक्याशी वाद घातला असता टोळक्यानं त्यांना मारहाण केली.
या मारहाणीत चव्हाण यांच्या डोक्याला आणि डोळ्याखाली दुखापत झालीय. या प्रकाराबाबत चव्हाण यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली, त्यावर रेल्वे पोलिसांनी मात्र असे प्रकार होतच असतात, असं सांगत त्यांनाच उपदेशाचे डॉस पाजण्याचा प्रयत्न केल्याचा चव्हाण यांचा आरोप आहे.
या प्रकारानंतर काही प्रवाशांनी चव्हाण यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं. मात्र रेल्वे पोलिसांनी संध्याकाळपर्यंत याबाबत गुन्हा दाखल केला नव्हता. दिवा स्थानकात असे प्रकार नेहमीच घडत असतात, याबाबत अनेकदा तक्रारीही केल्या, मात्र रेल्वे पोलीस याकडे लक्षच देत नसल्याचा रेल्वे प्रवासी संघटनेचा आरोप आहे. तर प्रवाशांनीही पोलीस तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलंय.
दिवा स्थानक हे अलीकडच्या काळात झपाट्यानं गर्दी वाढत चाललेलं स्थानक म्हणून समोर येतंय. मात्र या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी लोकल अपुऱ्या पडू लागल्या आहेत. काही वर्षांपूर्वी दिवावासीयांनी उग्र आंदोलन करत दिवा स्थानकात फास्ट लोकल्सना थांबा मंजूर करून घेतला होता. आताही लोकलची संख्या वाढावी, अशी दिवावासीयांची मागणी आहे. त्यात असे मारहाणीचे प्रकार सुरू झाल्यामुळे दिवावासियांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांना आतातरी जाग येईल, हीच अपेक्षा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement