(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mucormycosis : 'म्युकोरमायकॉसिस'च्या उपचारासाठीच्या इंजेक्शनचा तुटवडा
‘म्युकोरमायकॉसिस’ या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रुग्णांवर होतायेत. राज्यभरात अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. अशावेळी रुग्णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहे.
मुंबई : रेमडेसिवीरनंतर आता आणखी एका इंजेक्शनची कमतरता येत्या काळात भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कोरोनासोबतच मोठ्या संख्येनं आढळणाऱ्या ब्लॅक फंगस अर्थात म्युकोरमायकॉसिससाठी लागणाऱ्या इंजेक्शन्सचाही तुटवडा भासतोय. त्यामुळे, आता पुन्हा नव्याने इंजेक्शन आणि औषधांचा तुटवडा होऊ नये यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे.
कोरोनासोबतच आणखी एका आजारामुळे चिंता वाढलीय. कोरोनाचा साईडइफेक्ट असलेला हा आजार म्हणजे ब्लॅक फंगस म्युकोरमायकॉसिस. या आजारामुळे आतापर्यंत 8 जणांचे डोळे काढून टाकावे लागलेत. तर जवळपास 200 जणांना याची लागण झालीय. मात्र, या आजारातून बरे होण्यासाठी लागणारी इंजेक्शन्सही आता दूर्मिळ झाली आहेत. या आजाराचे रुग्ण वाढले तर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासू शकतो. शिवाय याची किंमतही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे.
‘म्युकोरमायकॉसिस’ या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रुग्णांवर होतायेत. राज्यभरात अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. अशावेळी रुग्णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहे. यासाठी तीन प्रकारचे वेगवेगळ्या किंमतींना असणारे इंजेक्शन उपलब्ध आहेत. मात्र, हे फंगल इन्फेकशन दूर्मिळ असल्याने आतापर्यंत मोठ्या संख्येनं या इंजेक्शनचा पुरवठा आणि उत्पादन होत नव्हते.
कोविडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बऱ्या झालेल्या कोविड रुग्णांमध्ये हा दू्र्मिळ आजाराचा संसर्ग आढळत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत ‘म्युकोरमायकॉसिस’ या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत. याचा मृत्युदर हा 54 टक्के आहे, मात्र वेळेवर उपचार घेतल्यास आजारातून बाहेर पडता येते. कोरोनानंतर कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे नाकामध्ये या बुरशीची वाढ होऊ शकते. नाकावाटे ही बुरशी डोळे आणि मेंदूकडे वाढत जाते. लवकरात लवकर निदान झाल्यास इंजेक्शनच्या माध्यमातून उपचार करता येतात. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पाच ते सात दिवसांत किंवा महिन्याभरानंतरही ही लक्षणे दिसू शकतात.
काय आहे ‘म्युकोरमायकॉसिस’?
- कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
- सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर ‘म्युकोरमायकॉसिस’ या बुरशीची वाढ होते.
- कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते.
- तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे.
म्युकोरमायकॉसिस घातक का आहे?
- या बुरशीचा संसर्गाचा वेग सर्वाधिक आणि उपचारासाठी वेळ कमी मिळतो.
- लवकर निदान झाले तर इंजेक्शनद्वारे उपचार शक्य आहेत.
- जर उशीर झाला तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते.
- डोळ्यांपाशी संसर्ग पोहोचल्यास त्यांना कायमस्वरुपी इजा होण्याची शक्यता असते.
- मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यास उपचार करणे दुरापास्त होते.
म्युकोरमायकॉसिसची लक्षणे काय?
- चेहऱ्यावर सूज येणे
- गाल दुखणे
- डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे
- डोके दुखणे, नाक दुखणे
- रक्ताळ किंवा काळसर जखम
काय काळजी घ्यायची?
- रोगप्रतिकारशक्ती संतुलित होईल यासाठी प्रयत्न करणे.
- संबंधित लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- म्युकोरमायकॉसिस या बुरशीच्या प्रसाराचा वेग जास्त आहे, त्यामुळे उपचारासाठी टाळाटाळ करू नका.
- रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करा, रक्तदाब नियंत्रित करा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल असा आहार घ्या.
यांनी घ्यावी विशेष काळजी
मधुमेह, उच्च रक्तदाब, कीटोॲसिडॉसिस, रोगप्रतिकारशक्ती कमी झालेले या सर्वांना विशेष काळजी घेणे गरजेचं आहे.
या आजाराची लागणच होऊ नये यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं आवश्यक आहे. तसेच, कोणतीही लक्षणं दिसली तर तातडीने डॉक्टरांना दाखवणेही गरजेचे आहे.. अशा भयानक आजाराबाबत ऐकून अनेक पेशंट आता रुग्णालयात तपासणीसाठी येतायेत. मात्र,घाबरुन न जाता योग्य वेळी योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य दरातले औषधे उपलब्ध असणंही तितकंच गरजेचं आहे.