भिवंडीत डीटोनेटर आणि जिलेटीन कांड्या जप्त, गुन्हे शाखेकडून तिघांना बेड्या
भिवंडीत नदीनाका येथे कार मधून जिलेटीन आणि डीटोनेटर जप्त करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
मुंबई : भिवंडीत नदीनाका येथे कार मधून जिलेटीन आणि डीटोनेटर जप्त करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील (वय 34, रा. आपटी खुर्द, ता. विक्रमगड), पंकज अच्छेलाल चौहान (वय 23, रा.विक्रमगड ) आणि समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा (वय 27, रा. वेडगेपाडा, ता. विक्रमगड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना एका मारूती इको कार मधून जिलेटीन आणि डीटोनेटर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने दुपारी तीन वाजता नदीनाका पोलीस चौकी समोर सापळा लावला. यावेळी मारूती इको कार (क्रमांक MH-04/FZ-9200 ) थांबवून गाडीतील संशयितांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता 5 बॉक्स मध्ये 1 हजार नग जिलेटिन कांड्या आणि 1 हजार नग डीटोनेटर आढळून आले. त्यामुळे पोलीस पथकाने तिघा संशयीतांना ताब्यात घेत कार सह 4 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथकाच्या मदतीने तपासणी करुन गाडीतील स्टोटके जप्त केली. ताब्यात घेतलेल्या तिन्ही संशयीतांविरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 286 सह भारताचा स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 च्या कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. परंतु, त्याआधीच भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकांनी भरलेली सामुग्री जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या