Alibaug Parasailing Accident : अलिबागमध्ये पॅरासेलिंग करताना दोर तुटला, वर्सोली बीचवरील घटना
अलिबागमध्ये पॅरासिलिंगला गेलेल्या पर्यटकांसोबत भयावह प्रकार घडला आहे. समुद्रामध्ये पॅरासेलींग करीत असताना अचानक दोर तुटल्याने त्या दोघी खाली पाण्यात कोसळल्या आहे.
रायगड : रायगडच्या अलिबागमध्ये पॅरासेलिंगला गेलेल्या दोन मैत्रिणींसोबत एक भयावह प्रकार घडला. दोन्ही मैत्रिणी पॅरासेलिंग करत असताना त्यांच्या बचावासाठी बोटीला बांधलेला दोर तुटला आणि दोघी 100 मीटर उंचीवरुन समुद्राच्या मध्यभागी पडल्या. यावेळी त्याच बोटीत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला. पण सुदैवानं दोन्ही महिलांनी लाईफ जॅकेट्स घातल्यानं बोट दोघींपर्यंत पोहचेपर्यंत लाटांवर तरंगत राहिल्या आणि बचावल्या.
मुंबईहून पर्यटनासाठी आलेल्या दोन महिला जखमी झाल्या आहेत. अलिबागच्या वर्सोली बीचवर पॅरासेलिंगवेळी 27 नोव्हेंबरला हा प्रकार घडला. या अपघातानं दोन्ही महिला आणि कुटुंबीय सध्या धक्क्यात आहेत. सुदैवाने या दोन्ही महिला बचावल्या आहेत. मात्र यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुददा ऐरणीवर आलाय.
गेल्या आठवडाभरापूर्वी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील साकीनाका येथील काहीजण फिरायला अलिबागला आले होते. त्यातील सुजाता नारकर व सुरेखा पाणीकर या दोन महिला पॅरासेलींगचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करीत होत्या. यावेळी, समुद्रामध्ये पॅरासेलींग करीत असताना अचानक दोर तुटल्याने त्या दोघी खाली पाण्यात कोसळल्या . सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. यावेळी, बोटीवरील जीवरक्षकांनी ताबडतोब दोघींना वाचविण्यासाठी धाव घेतली आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या या अपघातामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
Alibaug Parasailing Accident : ...आणि तुमच्या काळजाचा ठोका चुकेल
इतर बातम्या :