अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करा असे निर्देश महागरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करा असे निर्देश महागरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. कांदिवली येथील निष्कासन कारवाईप्रकरणी गगराणी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जमावाने केलेल्या हल्ल्यास सामोरे गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली. यानंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याच निदर्शे दिले आहेत.
कांदिवली परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करतेवेळी जमावाने महागरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, कारवाई करणाऱ्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. दरम्यान, परिसरातील सर्व अनधिकृत फेरीवाले तसेच पदपथावर अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, असे निर्देश श्री. गगराणी यांनी यावेळी दिले. उपायुक्त (परिमंडळ ) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (आर दक्षिण विभाग) श्रीमती आरती गोळेकर, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. याच अनुषंगाने, कांदिवली येथील श्री. विश्वकर्मण्ये चौक (लोखंडवाला सर्कल) परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर (दक्षिण) विभागाकडून काल (दिनांक ७ मार्च २०२६) निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना जमावाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. तसेच, संयंत्रे आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी आज कांदिवली येथील श्री. विश्वकर्मण्ये चौक (लोखंडवाला सर्कल) परिसरात भेट देऊन पाहणी केली. रस्त्यावर उभी करण्यात आलेली वाहने, पदपथांवर निर्माण झालेले अडथळे हे महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी प्रत्यक्ष उभे राहून निष्कासित कायला लावले. तसेच, डिलिव्हरीच्या दुचाकी उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पिझ्झा दुकानाला तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले.
गगराणी यावेळी म्हणाले की, अनधिकृत फेरीवाले आणि पदपथावर अनधिकृतपणे करण्यात येणाऱ्या बांधकामांमुळे वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना मार्गक्रमण करण्यास अडथळा निर्माण होतो. तथापि, महानगरपालिकेकडून त्यांच्याविरोधात सातत्याने कारवाई केली जाते. मात्र, नियमानुसार कारवाई करून सेवा बजावणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर अशाप्रकारे हल्ला करणे हे निंदनीय आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्या जमावात अनधिकृत फेरीवाल्यांसोबत काही स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या संबंधित महाविद्यालयांना याबाबत सूचना देऊन कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना मार्गक्रमण करण्यास अडथळा निर्माण करणारे अनधिकृत फेरीवाले आणि पदपथावर अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांविरोधी निष्कासनाची कारवाई यापुढेदेखील सुरूच राहील, असे देखील श्री. गगराणी यांनी यावेळी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या






















