शिवसेनेचा 'सामना'तून ममता दीदींवर निशाणा, यूपीएचं कौतुक तर काँग्रेसला सल्ला
Shiv Sena Saamana On Mamata Banerjee : भाजपविरोधी एकजूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांमधील वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. या वादात आज शिवसेनेनं ममता बॅनर्जी यांच्यावरच निशाणा साधला आहे.
Shiv Sena Saamana On Mamata Banerjee : भाजपविरोधी एकजूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांमधील वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. या वादात आज शिवसेनेनं ममता बॅनर्जी यांच्यावरच निशाणा साधत दे धक्का दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचं राजकारण सध्याच्या फॅसिस्ट राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखं असल्याची टीका शिवसेनेनं सामनामधून केली आहे. काँग्रेसशिवाय राष्ट्रीय राजकारणापासून दूर ठेवू शकत नसल्याचं सांगत यूपीएचं कौतुकही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलं आहे. तसंच यूपीएच्या नेतृत्वाचा मुद्दा आगामी काळात सुटेल, मात्र आधी पर्याय उभा करा असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.
सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असे ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात . दैवी अधिकार कोणालाच प्राप्त होत नाहीत . 2024 साली कुणाचे दैव , कोणाचे भाग्य फळफळेल ते सांगता येत नाही . भाजपचा जन्म कायम विरोधी बाकांवरच बसण्यासाठी झाला आहे , अशी टवाळकी पचवून हा पक्ष अवकाशात झेपावला आहे . आज राहुल गांधी , प्रियंका गांधींची राजकीय कुचाळकी सुरूच आहे. राहुल गांधी व प्रियंका अशा कुचाळक्यांना तोंड देत संघर्ष करीत आहेत . ' यूपीए ' नेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाचा ते येणारा काळ ठरवेल . आधी पर्याय तर उभा करा, असं सामनात म्हटलं आहे.
शिवसेनेनं म्हटलं आहे की, भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढ्या सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न. ममता बॅनर्जी या प. बंगालात एखाद्या वाघिणीप्रमाणे झुंजल्या, लढल्या व जिंकल्या. बंगालच्या भूमीवर भाजपास चारीमुंडय़ा चीत करण्याचे काम त्यांनी चोख पार पाडले. त्यांच्या संघर्षास देशाने प्रणाम केलाच आहे. ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय गाठीभेटी घेतल्या. ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. प. बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या 'फॅसिस्ट' राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱ्यांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे. काँग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षांतील घसरण चिंताजनक आहे याबाबत दुमत नाही. तरीही उताराला लागलेली ही गाडी पुन्हा वर चढूच द्यायची नाही व काँग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक आहेत. काँग्रेसचे दुर्दैव असे की, ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसकडून सुख - चैन - सत्ता प्राप्त केली तेच लोक काँग्रेसचा गळा दाबत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली नसेल, असा शाप दिला आहे, असंही सामनामध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसने लोकसभेत शंभरी पार केल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील 'गेम चेंज' होणार नाही
काँग्रेसने लोकसभेत शंभरी पार केल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील 'गेम चेंज' होणार नाही. त्यामुळेच भाजपची रणनीती काँग्रेसला रोखण्याची असेलच, पण हीच रणनीती मोदी अथवा भाजपविरोधाच्या मशाली पेटवणाऱयांनी ठेवली तर कसे व्हायचे? देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूपीए' आहेच कुठे? हा सवाल मुंबईत येऊन ममता बॅनर्जी यांनी विचारला. तो प्रश्नच सध्याच्या स्थितीत लाखमोलाचा आहे. यूपीए अस्तित्वात नाही तसा एनडीएही नाही. मोदी यांच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे.
यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच
यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे? हा प्रश्न आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कोणाकोणाला मान्य नाही त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत, स्पष्ट बोलावे. पडद्यामागून गुटरगूं करू नये. त्यातून गोंधळ आणि संशय वाढतो. त्याचप्रमाणे 'यूपीए'चे तुम्ही काय करणार? हे एकदा तरी श्रीमती सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी समोर येऊन सांगायला हवे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे हाच सध्या कळीचा मुद्दा आहे. 'यूपीए' नसेल तर दुसरे काय? या चर्चेतच वेळ घालवला जात आहे. ज्यांना विरोधकांची भक्कम आघाडी हवी आहे, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन 'यूपीए'च्या मजबुतीसाठी प्रयत्न करायला हवेत. एनडीए किंवा यूपीए या आघाड्या अनेक पक्षांच्या एकत्र येण्याने उभ्या राहिल्या. ज्यांना दिल्लीतील सध्याची राजकीय व्यवस्था खरोखर नको आहे, त्यांनी 'यूपीए'चे मजबुतीकरण हेच लक्ष्य ठेवले पाहिजे. काँग्रेसशी ज्यांचे मतभेद आहेत ते ठेवूनही 'यूपीए'ची गाडी पुढे ढकलता येईल. अनेक राज्यांत आजही काँग्रेस आहे. गोवा, ईशान्येकडील राज्यांत तृणमूलने काँग्रेस फोडली. पण त्यामुळे तृणमूलचे बळ दोन-चार खासदारांनी वाढले इतकेच. 'आप'चेही तेच आहे. काँग्रेसला खेचायचे व आपण चढायचे ही सध्याच्या विरोधकांची राजकीय चाणक्यनीती आहे.