बलात्कार प्रकरणी पोलीस निरीक्षक 3 महिन्यानंतर अटकेत; 7 दिवसांची पोलीस कोठडी
कडेगाव येथे बलात्कार प्रकरणी पोलीस निरीक्षकाला 3 महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनाववी आहे.
सांगली : कडेगाव येथे 28 वर्षीय युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी संशयित आरोपी पोलीस निरीक्षक विपीन हसबनिसला तब्बल 3 महिन्यानंतर अटक झाली आहे. हसबनिस याचा उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने तो कडेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला होता. यानंतर पोलिसांकडून तात्काळ अटकेची कारवाई करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्पर्धा परीक्षामध्ये मार्गदर्शन करण्याच्या आमिषाने हसबनिस याने एका 28 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने मागील 3 महिन्यापासून हसबनिस फरार झाला होता.
एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याबाबत बतावणी करून पीडित तरुणीला कडेगाव येथील बंगल्यावर आणून तिच्यावर बलात्कार केला असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक हसबनिस यांच्या विरोधात संबंधित पीडित तरुणीने कडेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. तरुणीच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस याच्याविरुद्ध 28 ऑगस्ट 2020 रोजी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान जिल्हा न्यायालयाने हसबनिस याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर हसबनिस याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. हा जामीन अर्ज देखील 2 दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने फेटाळला होता.
आज कडेगाव पोलिस ठाण्यात हसबनिस हा हजर झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तब्बल 3 महिन्यानंतर हसबनिस अटकेत आला आहे. त्यामुळे लोकांतून समाधान व्यक्त होत आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे या करीत आहेत.
संबंधित बातम्या :
पिंपरी चिंचवडमध्ये मावस बहिणींवर लैंगिक अत्याचार करून अपहरण, पाच आरोपींना बेड्या
फ्लाईटने मुंबईत येऊन चोरी करणाऱ्या बंगळुरुच्या ऑर्केस्ट्रा सिंगरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई