पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. यावर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत ही कर्जमाफी लागू करण्यात येणार आहे. यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण बहुमत असलेल्या सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या निर्णयाची अपेक्षा असताना ही अर्धवट, अपुरी आणि दिशाभूल करणारी कर्जमाफी असल्याची भारत दिघोळे यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मंचावरुन “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु” अशी घोषणा केली होती. त्या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता. परंतु आज वास्तव समोर आले असून मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे फक्त दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण बहुमत असलेल्या सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या निर्णयाची अपेक्षा असताना ही अर्धवट, अपुरी आणि दिशाभूल करणारी कर्जमाफी असल्याची सडकून टीका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने केवळ दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली
निवडणुकीच्या वेळी “सातबारा कोरा” करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने आज केवळ दोन लाखांपर्यंतची पीक कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची उघड फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या विळख्यातच अडकून राहणार आहेत. सरकारने जाहीर केलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान हे देखील अत्यंत तुटपुंजे असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. आज राज्यातील शेती उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला असताना, बाजारभाव अनिश्चित असताना आणि शेतकरी आर्थिक संकटात असताना अशी मर्यादित कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोपही भारत दिघोळे यांनी केला आहे.
सरकारने सरसकट सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी
सरकारने सरसकट सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा उतारा पूर्णपणे कोरा करावा. अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभर सरकारविरोधात तीव्र व व्यापक आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा” ही घोषणा जर फक्त निवडणूक जिंकण्यासाठी दिलेली असेल तर हा राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांवरील सर्वात मोठा विश्वासघात आहे. शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील शेतकरी आता मोठे आंदोलन उभारुन जाब नक्कीच विचारतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















