(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur By Election : सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अजून पक्षांचे उमेदवार गुलदस्त्यात आहेत. उमेदवारी दाखल करण्यामध्ये तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर काँग्रेस आणि शिवसेनेनं वेगळी चूल मांडण्याची तयारी केली आहे.
पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अर्ज दाखल करण्यामध्ये तीन दिवसांची सलग सुट्ट्या आल्याने केवळ तीनच दिवस उमेदवारांच्या हातात उरले असून अजून राष्ट्रवादी अथवा भाजपने आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने इच्छुकांची धाकधूक वाढू लागली आहे. 23 मार्चपासून या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. मात्र बंडखोरी केलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना व धनगर समाजाच्या वतीने असे दोनच उमेदवारी अर्ज अद्यापपर्यंत दाखल झाले आहेत. अशातच शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने उमेदवारांना केवळ आज, उद्या व मंगळवारी असे तीनच दिवस उमेदवारी दाखल करता येणार आहे.
यातच अजून राष्ट्रवादीकडे जयश्री भालके किंवा भगीरथ भालके यांच्यातील उमेदवारीचा घोळ संपला नसल्याने ही उमेदवारी जाहीर झालेली नाही तर भाजपकडून विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक अथवा गेल्यावेळचे अपक्ष उमेदवार समाधान अवताडे यातील एकाचं नाव अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे या दोन्ही प्रमुख पक्षांनी अद्याप आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत.
यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि धनगर समाजाचे संजय माने यांनी उमेदवारी दाखल करीत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली असताना आता शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी बंडाचा झेंडा फडकावत थेट गावोगावी प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्यावेळी त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देत शिवसेनेत प्रवेश दिला होता. मात्र गेल्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी उमेदवारी दाखल करण्याची घोषणा करीत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य असून महिला वर्गात त्या चांगल्याच लोकप्रिय आहेत.
शिवसेना उमेदवारी देणार नाही याची जाणीव ठेवूनच त्यांनी अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला असून गेल्या काही दिवसापासून गावभेटीचा धडाका लावला आहे . आता लोकशाही आघाडीतील उरलेल्या काँग्रेसनेही पंढरपूर जागेवर आपला दावा केला असून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी आम्ही निवडणूक लढविणार असल्याचा दावा केल्याने निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला या मित्रपक्षातील बंडखोरांची समजूत काढायचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
त्या तुलनेने भाजप व मित्र पक्षाकडून एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून समाधान अवताडे यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे . राष्ट्रवादी मध्येही भगीरथ भालके यांनाच उमेदवारी द्या असा आग्रह कार्यकर्त्यातून वाढत चालल्याने पक्ष समोरचा पेच वाढला आहे . खुद्द शरद पवार हे तासगाव पॅटर्नप्रमाणे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके याना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत मात्र त्यांचा मुलगा भगीरथ याच्यासाठी कार्यकर्ते आग्रही झाल्याने हि उमेदवारी कोणाकडे जाते यावर भाजपचा उमेदवार ठरला जाईल असे सांगितले जात आहे . अशा परिस्थितीत येत्या दोन दिवसात उमेदवारी जाहीर न झाल्यास उमेदवारी दाखल करण्यासाठी केवळ मंगळवारचा एकचं दिवस मिळणार आहे .