जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार
नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शन घेणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली.
मुंबई : नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा 19 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. या यात्रेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या यात्रेदरम्यान नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेणार आहेत. ज्यावरुन राजकारण तापलं आहे. विशेष म्हणजे नारायण राणे पहिल्यांदाच स्मृती स्थळावर जाणार आहेत. राणे यांची यात्रा दोन दिवस मुंबईत असणार आहे. पहिल्याच दिवशी विमानतळावरून या यात्रेला सुरुवात होईल. विमानतळाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन राणे दादरच्या दिशेने मार्गक्रमण करतील. आणि शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतील. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मृतीस्थळ असलेल्या चैत्यभूमीचंही दर्शन घेणार आहेत.
जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून 19 आणि 20 तारखेला मुंबईत शक्तिप्रदर्शन होईल. 21 तारखेला वसई-विरार आणि 23 ते 26 ऑगस्ट कोकणात जन आशीर्वाद यात्रा होणार आहे. नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शन घेणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली.
शिवसेनेचा विरोध
शिवसेनेचे खासदार आणि नारायण राणे यांचे कट्टर विरोधक विनायक राऊत यांनी मात्र नारायण राणे यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळ दर्शनाला कडाडून विरोध केला आहे. 'नारायण राणेंसारख्या विश्वास घातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्यासारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी ज्याने बेईमानी केली असा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा घरफोड्या माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला शिवसैनिक भेट देऊ देणार नाहीत.' असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. एवढंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी नाराय़ण राणे शिवसेनेच्या विरोधात उभे राहतात, त्या त्या ठिकाणी शिवसेनेचाचं विजय होतो. नारायण राणेंचं पानिपत करण्याची ताकद शिवसैनीकांमध्ये आहे. त्यामुळे राणेंना मुंबई महापालिका द्या, ठाणे महानगर पालिका द्या नाहीतर अन्य काही द्या. तिथं शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्या शिवाय राहणार नाही. असं सांगायलाही विनायक राऊत विसरले नाहीत.
मुंबई, वसई-विरार या भागात राणे जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून फिरणार आहेत. येत्या सहा महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर राणे यांचा हा दौरा भाजपाला बळकटी देतो का? हे बघावं लागेल.
संबंधित बातम्या :
भाजपच्या 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात; केंद्रातले 39 मंत्री 212 लोकसभेपर्यंत पोहोचणार, महाराष्ट्रातले मंत्रीही सक्रिय
मोदींच्या नव्या शिलेदारांच्या नेतृत्वात भाजपची 'जन आशीर्वाद यात्रा