एक्स्प्लोर
आमच्यासारखं तुम्हालाही लोक घरी पाठवतील : अजित पवार
बाहेरुन आलेले सगळे निघून जातील, आणि भाजपमध्ये फक्त जुने जनसंघवाले आणि रा. स्व. संघाला मानणारेच शिल्लक राहतील, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
नागपूर : भाजपमध्ये आलेले लोकही नाराज होऊन पक्ष सोडून चालले आहेत. काही तरी निर्णय घ्या, नाहीतर भाजपमध्ये केवळ जुने संघवालेच शिल्लक राहतील, अशी टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. त्याचप्रमाणे तीन वर्षांपूर्वी जसे लोकांनी आम्हाला घरी पाठवले होते, तसे ते आता तुम्हाला घरी पाठवतील, असा उपरोधिक सल्ला अजित पवार यांनी दिला.
सरकारवर जोरदार टीका करताना कर्जमाफीबरोबरच शेतमालाच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
सरकार घोषणा भरपूर करते, परंतु काम काही करत नाही. कर्जमाफीचा निर्णय घेऊन लोकांचा सातबारा कोरा केल्याच्या जाहिराती सरकारने केल्या. पण चार महिने होऊन गेले, तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सुरुवातीपासून सरकारची कर्जमाफी देण्याची मानसिकताच नव्हती. जेव्हा जेव्हा आम्ही ही मागणी केली तेव्हा, योग्य वेळ आली की कर्जमाफी देऊ, असं उत्तर दिलं गेलं, असं अजित पवार म्हणाले.
विरोधकांनी संघर्ष यात्रा काढल्यावर सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आणि इच्छा नसताना कर्जमाफीची घोषणा सरकारला करावी लागली. मात्र आजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. सरकार चालवायला धमक लागते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता लागते, अशी खरपूस टीका अजित पवार यांनी केली.
भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे भाजपचेच आमदार-खासदार नाराज आहेत. नाना पटोले यांनी राजीनामा दिला तर आशिष देशमुख यांनीही नाराजीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. हे असेच सुरु राहिलं तर बाहेरुन आलेले सगळे निघून जातील, आणि भाजपमध्ये फक्त जुने जनसंघवाले आणि रा. स्व. संघाला मानणारेच शिल्लक राहतील, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
राज्यातील कापूस, धान ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. आता केवळ कर्जमाफी करुन चालणार नाही, तर शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्यावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतमालाला भाव देऊ असे वचन विदर्भात येऊन दिलं होतं, पण ते पूर्ण केलं नाही. लोकांची सहनशीलता संपत आली आहे. काहीतरी निर्णय घ्या. नाही तर तीन वर्षांपूर्वी जसे लोकांनी आम्हाला घरी पाठवले होते, तसे ते आता तुम्हाला घरी पाठवतील, असा उपरोधिक सल्ला अजित पवार यांनी दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement