Raj Thackeray : मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मे पर्यंत मुदत, ऐकला नाहीत तर.., राज ठाकरेंचा इशारा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राज्यातील गृहखातं अंमलबजावणी का करत नाही असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
ठाणे: मशिदींवरील भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभरातील मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.
भोंग्यांचा आवाज हा बेसूरा असतो, त्यामुळे शांतता बिघडते असं सांगत राज ठाकरे म्हणाले की, "इतरांची शांती बिघडवून तुम्ही तुमचा भोंगे वाजवून प्रार्थना करा असा कोणताही धर्म सांगत नाही. इतरांची शांती भंग होईल अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देण्यात येणार नाही असं 18 जुलै 2005 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीत सांगितलं आहे. आता 3 तारखेपर्यंत ऐकला नाही तर देशभरातील मशिदींच्या समोर हनुमान चालीसा लावा."
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राज्यातील गृहखातं अंमलबजावणी का करत नाही असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. राज्य सरकारचे हे मतांसाठी राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मशिदीच्या भोंग्यावर आपण या आधीही आवाज उठवल्याचं राज ठाकरेंनी या सभेमध्ये सांगितलं आहे.
मशिदींच्या भोंग्याच्या आवाजासंबंधी मी या आधीही आवाज उठवला होता, अजित पवारांना तो ऐकू आला नाही. या मशिदीच्या भोंग्यामुळे देशाला त्रास होतोय, यामध्ये धार्मिक विषय कुठेय असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. अजित पवारांना या आधीच्या वक्तव्याची आठवण करुन देण्यासाठी राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडीओ' चा मार्ग अवलंबला.
राज ठाकरे म्हणाले की, "मशिदींच्या भोंग्यांमुळे लोकांना त्रास होतोय. रस्त्यांवरील नमाजामुळे लोकांना त्रास होतोय. राज्य सरकारने याचा सोक्षमोक्ष लावावा, आम्ही आमची भूमिका सोडणार नाही."
महत्त्वाच्या बातम्या: