Raj Thackeray : राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडीओ'; मशिदींच्या भोंग्यावर या आधीही आवाज उठवल्याचा दिला पुरावा
MNS Raj Thackeray : मशिदीच्या भोंग्यावर आपण या आधीही आवाज उठवल्याचं राज ठाकरेंनी या सभेमध्ये सांगितलं आहे.
ठाणे: मशिदींच्या भोंग्याच्या आवाजासंबंधी मी या आधीही आवाज उठवला होता, अजित पवारांना तो ऐकू आला नाही. या मशिदीच्या भोंग्यामुळे देशाला त्रास होतोय, यामध्ये धार्मिक विषय कुठेय असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. अजित पवारांना या आधीच्या वक्तव्याची आठवण करुन देण्यासाठी राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडीओ' चा मार्ग अवलंबला.
या आधी भोंगे दिसले नाहीत का, यांना आता जाग आली अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंवर केली होती. त्याला राज ठाकरेंनी व्हिडीओंच्या माध्यमातून उत्तर दिलं.
राज ठाकरे म्हणाले की, "सकाळच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी जो आवाज काढला त्यामुळे अजित पवारांना ऐकायचं कमी झालं. 28 जुलै 2018,
1 ऑगस्ट 2018 आणि लॉकडाऊन लागायच्या आधी जानेवारी 23 रोजी आपण या मुद्द्यावर आवाज उठवला होता. आजही तीच भूमिका आहे."
राज ठाकरे म्हणाले की, "मशिदींच्या भोंग्यांमुळे लोकांना त्रास होतोय. रस्त्यांवरील नमाजामुळे लोकांना त्रास होतोय. राज्य सरकारने याचा सोक्षमोक्ष लावावा, आम्ही आमची भूमिका सोडणार नाही."
तीनपैकी दोन व्हिडीओ 'एबीपी माझा'चे
राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांच्या 'उत्तर'च्या सभेत तीन व्हिडीओ लावले. या तीन व्हिडीओंपैकी दोन व्हिडीओ हे एबीपी माझाचे आहेत. त्यापैकी 28 जुलै 2018 रोजीच्या एका व्हिडीओत त्यांनी मशिदींवरच्या लाऊडस्पीकरवर भाष्य केलं होतं. तर 1 ऑगस्ट 2018 रोजीच्या व्हिडीओत सायलेन्ट झोनवर प्रश्न उपस्थित करताना मशिदींवरील भोंग्यांवर भाष्य केलं होतं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या दहा दिवसांत राज ठाकरे यांची ठाण्यात आज दुसरी सभा होत आहे.
मनसेनं या सभेला उत्तर सभा असं म्हटलंय. या सभेचा दुसरा टीझर मनसेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात असे विधानं शरद पवार यांनी करत मनसेच्या थेट वर्मावर बोट ठेवलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या:
- शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक गुण आहेत..,पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं?: राज ठाकरे
- Raj Thackeray : मशिदींच्या भोंग्यांना 3 मे पर्यंत मुदत, ऐकला नाहीत तर.., राज ठाकरेंचा इशारा
- समान नागरी कायदा आणा आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा करा; राज ठाकरेंची मोदींकडे मागणी